ठाणे : ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या झाल्या असून, ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या प्रमुखपदी सहाय्यक आयुक्त उत्तम कोेळेकर यांची नियुक्ती झाली आहे. हा नवीन पदभार स्विकारण्यापूर्वी ते पोलीस मुख्यालय एकमध्ये कार्यरत होते.
या बदल्यांसह नऊ पोलीस निरीक्षकांच्याही बदल्या झाल्या असून काहींना वरिष्ठ निरीक्षकपदी बढती मिळाली आहे. तर काही निरीक्षकांच्या बदल्या ठाणे आयुक्तालयांतर्गत असलेल्या ‘साईड ब्रांच’ मध्ये करण्यात आल्या. वरिष्ठ निरीक्षकपदी नियुक्त अरुण क्षीरसागर यांची बदलापूर, कन्हैयालाल थोरात यांची कळवा, अप्पासाहेब जानकर यांची कोनगाव वाहतूक शाखेत, अंकुश म्हस्के यांची विशेष शाखेत, सुनिल पुंगळे यांची नियंत्रण कक्षात, आनंद रावराणे यांची मालमत्ता कक्ष/गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षकपदी, दत्ता गावळे यांची नियंत्रण कक्षात, राजेंद्र अहिरे यांची उल्हासनगर गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी (घटक ४) आणि चितळसर मानपाडाच्या वरिष्ठ निरीक्षकपदी गिरीश गोळे यांची नियुक्ती करण्यात आली.
चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकपदी असलेल्या सुलभा पाटील, एमपीडीए गुन्हे शाखेचे विजय पवार आणि गुन्हे शाखा युनिट ४ चे निरीक्षक अनिल मांगले हे दोन्ही वरिष्ठ निरीक्षक पदस्थापनेच्या प्रतिक्षेत आहेत.