बेकायदा वाहिन्यांचे जाळे नागरीकांच्या जीवावर

पालिकेची कारवाई थंडावली

ठाणे : ठाणे महापालिकेच्या हद्दीत झाडे आणि विजेच्या खांबांवर बेकायदेशीरपणे टाकलेल्या इंटरनेट आणि इतर वाहिन्या काढून टाकण्याचा ठराव दीड वर्षांपुर्वी मंजूर करण्यात आला होता. सुरुवातीला वाहिन्या काढून टाकण्याची कारवाई सुरु करण्यात आली, परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावली आहे. या वाहिन्या नागरिकांच्या जिवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठामपाला द्यावे लागणारे शुल्क चुकवण्यासाठी अनेक पुरवठादार पालिकेच्या परवानगीविनाच शहरात झाडे आणि विजेच्या खांबांवर इंटरनेट आणि अन्य वाहिन्यांचे जाळे विणत आहेत. या वाहिन्या तुटून अपघात होत असून नागरिकांना इजा होण्याचा धोकाही संभवतो. काहीजण पालिकेचा रस्ता बेकायदा फोडून त्यात वाहिन्या टाकत आहेत. तो रस्ताही योग्य प्रकारे बुजवत नसून अनेक ठिकाणी नवीन रस्तेही खोदले जात आहेत.

दीड वर्षांपुर्वी वाहीन्या काढून घेण्याबाबत वृत्तपत्रात जाहीर नोटीस देण्यात आली होती. या नोटीसची मुदत संपुष्टात येताच विद्युत विभागाचे तत्कालीन उपनगर अभियंता विनोद गुप्ता यांनी अशा वाहिन्या काढून टाकण्याची कारवाई सुरु केली होती. परंतु गेल्या काही महिन्यांपासून ही कारवाई थंडावल्याचे चित्र असून यामुळे संबंधित पुरवठादारांचे फावले आहे.

वृक्ष आणि विद्युत खांबांवर विनापरवाना टाकण्यात आलेल्या इंटरनेट तसेच इतर वाहिन्यांवर आमच्या विभागाकडून कारवाई सातत्याने केली जात आहे. कारवाईनंतर पुन्हा वाहिन्या टाकल्या जात आहेत. त्यावर ठोस उपाययोजना करणे गरजेचे असून त्यासाठी आम्ही वरिष्ठांशी चर्चा करणार आहोत, अशी माहिती उपनगर अभियंता शुभांगी केसवानी यांनी दिली.