गुड बुकच्या नादात बॅड बुकात दाखल?
ठाणे : महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या गुड बुकमध्ये जाण्यासाठी ठाणे महापालिकेच्या दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी वापरलेली क्लृप्ती त्यांच्याच अंगलट आली आहे. ते अधिकारी गुड बुक ऐवजी बॅड बुकमध्ये गेल्याची चर्चा दबक्या आवाजात महापालिका वर्तुळात सुरू आहे.
महापालिका आयुक्त श्री.बांगर यांनी आयुक्त पदाचा पदभार घेतल्यापासून स्वच्छता, साफसफाई, शहरातील रस्ते-पदपथ आणि रंगरंगोटी याकडे लक्ष केंद्रित केले आहे. शहरातील विविध भागांचा पाहणी दौरा करून ते अधिकारी आणि ठेकेदारांना धारेवर धरत आहेत. अधिकाऱ्यांना देखिल त्यांची भेट घेण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. एक अधिकारी त्यांच्या दालनात असेल तर दुसऱ्या अधिकाऱ्यांनी दालनात येऊ नये अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली आहे, त्यामुळे महापालिका आयुक्त श्री. बांगर यांच्या गुड बुकमध्ये जाण्यासाठी अधिकारी प्रयत्न करत आहेत. अशाच प्रकारचा प्रयत्न एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘नस्ती’च्या मदतीने आयुक्तांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु आयुक्तांच्या चाणाक्ष नजरेत त्यांची ‘वेगळी’ हुशारी लक्षात येताच आयुक्तांनी त्यांची चांगलीच कानउघाडणी केली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात सुरू आहे.
हे अधिकारी आपल्याला अडचणीत आणतील अशी शक्यता गृहीत धरून महापालिका आयुक्त या अधिकाऱ्यांपासून चार हात दूर राहत असल्याचेही बोलले जात आहे.
नवीन आलेल्या आयुक्तांचा विश्वास संपादन करण्यासाठी सर्व अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात. नवनवीन फंडे वापरत असतात. सर्व महापालिकांमध्ये असा प्रकार सर्रास पाहायला मिळतो. काही अधिकारी नागरी कामांच्या माध्यमातून तर काही अनोख्या संकल्पना राबवून आयुक्तांची मर्जी संपादन करण्याचा प्रयत्न करत असतात. ठाणे महापालिकेतही असे प्रकार निदर्शनास येतात. मात्र आयुक्तांच्या वैचारिक खोलीचा अंदाज न घेता एखादी ‘नस्ती’ क्लृप्ती वापरल्याने आयुक्तांची खप्पा मर्जी झाल्याचा हा प्रकारही पहिलाच असावा, अशी चर्चा सुरू झाली आहे.
‘नस्ती’ उठाठेव कोणती?
नवीन आयुक्त अभिजित बांगर यांनी पदभार स्वीकारताच त्यांच्या कामातून त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. असे असताना आयुक्तांची नाराजी ओढावणारी ती ‘नस्ती’ क्लृप्ती कोणती, आणि ते अधिकारी कोण, याची उत्सुकता अन्य अधिकाऱ्यांमध्ये ताणली गेली आहे.