* ११ दिवस पाठलाग करून दोन मुलांची सुटका
* ठाण्यासह पाच शहरांत शोध; तिघांना अटक
मुंबई : भीक मागण्यासाठी मुलांचे अपहरण करणाऱ्या एका टोळीला कांजूर मार्ग पोलिसांनी गजाआड केला आहे. यासाठी ठाणे शहरासह पाच शहरांत शोध मोहीम राबविण्यात आली.
फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिच्या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले होते. या दोन मुलांची सुटका करण्यासाठी पोलिसांनी तब्बल ११ दिवस आरोपींचा पाठलाग केला आणि अखेर त्यांची सुटका करून दोन्ही मुलांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून एक महिला आरोपी फरार आहे.
कांजूर मार्ग पोलीस ठाण्याच्या हद्दीत कांजूर रेल्वे स्थानक फुटपाथवर राहणाऱ्या वर्षा कांबळे हिचा पाच वर्षाचा मुलगा आणि एक वर्षाची मुलगी या दोघांचे अपहरण करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पुण्याहून मुंबईकडे येताना ट्रेनमध्ये वर्षाची काळे कुटुंबीयांशी ओळख झाली होती आणि त्यांनीच आपल्या मुलांचे अपहरण केले असल्याचे तिने पोलिसांना सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर काळे कुटुंबीयांचा ठाणे, कोल्हापूर, सांगली, नगर, औरंगाबाद या शहरात शोध घेऊन पाठलाग केला आणि यांच्यातील मुख्य आरोपी हर्षद काळे याच्यासोबत ताराबाई काळे चंदू काळे तसेच आणखी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.
हर्षद काळे याची बायको पौर्णिमा काळे ही सध्या फरार आहे. वर्षा हिच्या दोन मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. पोलीस चौकशीत या दोन मुलांचे अपहरण भीक मागण्यासाठी केले असल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर आले आहे. परंतु त्यानंतर पुढे या मुलांचे हे लोक काय करायचे आणि आतापर्यंत अशा किती मुलांचे त्यांनी अपहरण केले आहे याचा तपास सध्या कांजूरमार्ग पोलीस करत आहेत.
कांजूर मार्ग पोलिस स्टेशनमधील वरिष्ठ पोलिस अधिकारी पुरषोत्तम कराड यांनी याबद्दल अधिक माहिती देताना सांगितलं की, कांजूर मार्ग रेल्वे स्थानकाच्या बाहेरुन या दोन मुलांचे अपहरण करण्यात आले. आरोपींनी तीन ते चार दिवस या मुलांवर नजर ठेवली होती आणि त्यानंतर अपहरण केले. यानंतर पोलिसांनी याच्या तपासासाठी पाच पथके तयार केली. त्यानंतर ठाणे, पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद आणि इतर ठिकाणी ही पथके पाठवली. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली असून एक महिला आरोपी फरार आहे. केवळ भीक मागण्यासाठी या मुलांचं अपहरण करण्यात आलं होतं की अजून काही उद्देश या मागे होता याबद्दल तपास सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्या एका आरोपीवर चोरीचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.