अल्मेडा चौक उड्डाणपुलाच्या कॉंक्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात

मखमली तलाव रस्त्यावर वाहतुकीची होणार ‘महाकोंडी’

ठाणे : ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये नौपाडा वाहतूक उपविभाग हद्दीमध्ये ‘ठाणे पीडब्ल्यूडी’ने अल्मेडा चौक उड्डाणपुलाच्या अ‍ॅप्रोच युटीडब्ल्यूटी  सिमेंट काँंक्रिटीकरणाच्या कामांना मंगळवारपासून सुरुवात केली आहे.

या रस्त्यावर दुतर्फा असलेल्या लहान-मोठ्या दुकानांमुळे दररोज लहान-मोठ्या वाहनांची गर्दी, कोंडी होत असतेच. त्यात आता या कामांना प्रारंभ झाल्यामुळे चालकांना मन:स्ताप सोसत अन्य पर्यायी मार्ग शोधावे लागणार आहेत.

ठाणे शहर वाहतूक विभागाचे उपायुक्त डॉ. विनयकुमार राठोड यांनी यासंबंधीची अधिसुचना १३ डिसेंबर २२ रोजी जारी केली. या परिसरात वाहतुकीची कोंडी होऊ नये, वाहतूक सुरळीत होण्याकरीता आणि काँक्रिटीकरणाची सर्व कामे संपेपर्यंत अधिसुचना अंमलात राहणार आहे, असे त्यांनी ‘ठाणेवैभव’ला सांगितले.

कोणत्याही वाहनांसाठी हा पूल खुला नसल्यामुळे मखमली तलाव रस्त्यावर आणि लगतच्या भागांत वाहतुकीची प्रचंड कोंडी होणार आहे. ही  कामे मंगळवारपासून सुरु झाली असली तरी संबंधित कामे संपेपर्यंत असंख्य वाहन चालकांना सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

काँक्रिटीकरणाची कामे मे.एन.ए. कन्स्ट्रक्शनने सुरु  केल्यानंतर अल्मेडा उड्डाणपुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात येईल.

येथील वाहतूक ही उड्डाणपुलाच्या समांतर खालून वळवण्यात येणार आहे. त्यामुळे कामांच्या ठिकाणी वाहतुकीत  बदल करण्यात येणार आहे. अल्मेडा चौक उड्डाणपूल खोपट सिग्नलकडून एलबीएस रोड तीन पेट्रोल  पंपकडे जाणारी वाहिनी खोपट सिग्नलजवळील उड्डाणपूल चढणी बंद करण्यात येणार आणि अल्मेडा चौक उड्डाणपूल तीन पेट्रोल पंपमार्गे एलबीएस रोडकडून खोपट सिग्नलकडे जाणारी वाहिनी उड्डाणपूल चढणी येथे वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे.