मोटोफिट्स ॲप टॅबची आ. संजय केळकर यांच्याकडून पाहणी
ठाणे : प्रवाशांना विविध सुविधांबरोबरच सुरक्षा देणारे मोटोफिट्स ॲप रिक्षाचालकांना चांगला मोबदला देणारे ठरणार आहे. विशेष म्हणजे रिक्षाचालकांची मलिन होऊ पाहणारी प्रतिमा सुधारून रिक्षाचालक आणि प्रवाशांच्या नात्यात सुधारणा यामुळे होणार आहे. आमदार संजय केळकर यांनी कंपनीच्या तंत्रज्ञ मंडळींशी चर्चा करून ॲप टॅबची पाहणीही केली.
रिक्षा व्यवसायात काही गुन्हेगारी वृत्तीची मंडळी आल्याने महिला प्रवाशांशी गैरवर्तनाच्या घटना घडल्या आहेत. भाड्यावरून चालक आणि प्रवाशांमध्ये वारंवार भांडणे होत आहेत. एकूणच सध्या नागरिकांमध्ये रिक्षाचालकांबाबत काही प्रमाणात नाराजी आहे. या दोघांमधील संबंध सुधारणारे ॲप ऑटोमोटोस या कंपनीने तयार केले आहे. हे ॲप असलेले टॅब रिक्षाचालकांना मोफत देण्यात येणार आहेत. हे टॅब रिक्षाचालकांना चांगले उत्पन्न देणारे ठरणार आहे. या टॅबमध्ये व्यावसायिक जाहिराती प्रदर्शित करण्यात येणार असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नातून रिक्षाचालकांना मासिक दोन हजार रुपये मोबदला आणि दोन लाखांचा विमा देण्यात येणार आहे. विविध सामाजिक संस्था, संघटना, कार्यकर्ते आदी घटकांना त्यांच्या कार्याची आणि उपक्रमांची प्रसिद्धी या टॅबद्वारे करता येणार आहे.
प्रवाशांची तब्येत अचानक ढासळल्यास त्याला जवळच्या रुग्णालयात नेल्यास तसेच शिवाय उत्तम प्रवासी सेवा देणाऱ्या रिक्षा चालकास प्रवाशांकडून रेटिंग देण्याची सुविधा टॅबमध्ये आहे. त्याचाही अतिरिक्त आर्थिक लाभ रिक्षाचालकांना मिळणार आहे. या टॅबमध्ये जाहिरातींबरोबरच विविध सेवा भरतीच्या अर्जाचे नमुने उपलब्ध होणार आहेत. प्रवाशांसाठी प्रथमोपचार पेटीही रिक्षा चालकांना देण्यात येणार आहे. लवकरच या टॅबमध्ये पॅनिक बटण देण्यात येणार आहे. रिक्षाचालकांचे गैरवर्तन आढळून आल्यास टॅबला जोडलेले पॅनिक बटण प्रवाशाने दाबल्यास जवळच्या पोलीस स्थानकाला आणि प्रवाशाच्या नातेवाईकांना तत्काळ माहिती मिळणार आहे. या टॅबच्या कार्यप्रणालीची माहिती आमदार संजय केळकर यांनी जाणून घेतली. सर्व रिक्षाचालकांना परिपूर्ण टॅब दिल्यास रिक्षाचालक आणि प्रवाशांचा सुसंवाद घडून चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकतात आणि रिक्षाचालकांना चांगला मोबदलाही मिळू शकतो, असे श्री.केळकर यांनी सांगितले.