कल्याण : महापालिका आयुक्तांनी पालिकेतील सर्व्हेअरना रेरा प्रकरणातील अनधिकृत बांधकामे शोधण्यासाठी ४८ तासाचा अल्टीमेट्म दिला. यानंतर शुक्रवारी सकाळी फिल्डवर उतरलेल्या पालिकेच्या १५ सर्व्हेअरनी एका दिवसात रेरा प्रकरणातील ६५ बांधकामे शोधून काढल्याचा अहवाल दिल्याचे समजल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
अडीच महिन्यात पालिकेला सापडत नसलेली बांधकामे अवघ्या एका दिवसात कशी सापडली असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत असून याच धर्तीवर पालिकेतील सर्व अनधिकृत बांधकामे शोधून काढणे पालिकेला अशक्य नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात लाखो अनधिकृत बांधकामे उभी आहेत. मात्र भूमाफियांनी महापालिकेच्या खोट्या परवानग्या दाखवत त्या आधारे या बांधकामांना महारेरा प्रमाणपत्र मिळवत ही बांधकामे अधिकृत असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला आहे. अशी ६५ बांधकामे वास्तुविशारद संदीप पाटील यांनी शोधून काढत या बांधकामांविरोधात केलेल्या तक्रारीवर पालिका कारवाई करत नसल्याने त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती.
न्यायालयाच्या आदेशानुसार या बांधकाम व्याव्सायीकां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास सुरु असताना पालिका प्रशासनाकडून काय कारवाई करण्यात आली असा सवाल न्यायालयाने उपस्थित केला होता. पालिकेने केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करताना पालिका प्रशासनाने ही बांधकामे शोधण्याचे काम सुरु असल्याचे म्हटले होते तर पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी पालिकेतील सर्व १५ सर्व्हेअरना ही बांधकामे सर्व्हे नकाशाच्या आधारे शोधण्याच्या ऑर्डर दिल्या होत्या, मात्र आदेश देऊन १५ दिवस उलटल्यानंतरही सर्व्हेअरनी काम करण्यापेक्षा ऑर्डर रद्द करण्यासाठी थेट मंत्रालयातून दबाव आणल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु होती. त्यातच तक्रार करून अडीच महिन्याचा कालावधी उलटला तरी पालिकेला ही बांधकामे सापडत नव्हती आणि आयुक्तांनी या सर्व्हेअरच्या काढलेल्या ऑर्डर तांत्रिक अडचण सांगत रद्द केल्याने आयुक्तांवर अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालत असल्याचा आरोप होऊ लागला होता.
न्यायालयाचा दबाव आणि वास्तुविशारदासह नागरिकाकडून होणाऱ्या टिकेनंतर आयुक्तांनी पालिकेतील सर्व सर्व्हेअरना ४८ तासात बांधकामे शोधण्याचे आदेश दिले होते. मात्र शुक्रवारी सकाळीच फिल्डवर उतरलेल्या या सर्व्हेअरनी एका दिवसात ६५ बांधकामे शोधून काढल्याने प्रशासनाची इच्छाशक्ती असल्यास शहराचा कायापालट होण्यास वेळ लागणार नसल्याच्या प्रतिक्रिया येत आहेत.
वास्तूविशारद संदीप पाटील रेरा बनावट परवानगी प्रकरण तक्रारदार यांच्याशी संपर्क साधला असता गुरुवारी आयुक्त यांच्या भेटी दरम्यान बोगस रेरा प्रकरणी बांधकाम परवानगी इमारती शोधण्यासाठी मदत लागली तर मदत करणार आणि आयुक्तांच्या भेटीत बोगस रेरा परवानगी इमारतीवर कारवाई होणार असल्याचे आयुक्तांनी अश्वासित केले असल्याचे त्यांनी सांगितले.