* जास्त दराने निविदा भरणाऱ्याला प्राधान्य
* दिवसातून एकच वेळ होणार सफाई
ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील मुख्य रस्त्यांची सफाई ना नफा ना तोटा या तत्वावर करण्यास काही ठेकेदार तयार असताना प्रशासनाकडून जास्त दराने निविदा भरणाऱ्या ठेकेदारांना प्राधान्य देण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. विशेष म्हणजे दिवसातून एकदाच ही रस्ते सफाई केली जाणार असून यासाठी पालिका तब्बल ४० कोटीं ठेकेदाराला मोजणार आहे.
कोरोनामुळे पालिकेची आर्थिक स्थिती खालावली असल्याने पालिकेने काही प्रकल्पांना कात्री लावली आहे. तर दुसरीकडे रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी पालिकेचे सफाई कामगार कमी पडत असल्याने पालिकेने खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून शहरातील २२ गटातील रस्त्यांची साफसफाई सुरु केली आहे. त्यानुसार या कामासाठी १०४० कर्मचाऱ्यांची नियुक्ती खासगी ठेकेदाराच्या माध्यमातून केली जाणार आहे. ठाणे महापालिकेने यासाठी २२ निविदा काढल्या असून यामध्ये केवळ शहरातील मुख्य रस्त्यांची सफाई केली जाणार आहे. एप्रिल महिन्यात रस्ते सफाईची मुदत संपल्याने या निविदा काढण्यात आल्या असून यासाठी ४० कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. मात्र निविदा भरताना ज्या ठेकेदारांनी जास्त दराने निविदा भरल्या आहेत त्यांनाच या कामांसाठी प्राधान्य देण्यात आले असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
पालिका हद्दीतील २५० किमीच्या रस्त्यांची यामध्ये सफाई होणार असून सकाळी ७ ते ३ या सत्रात एकच वेळ ही सफाई केली जाणार आहे. २२ स्वतंत्र निविदा काढण्यात आल्या असल्याने प्रत्येकाला विभागानुसार सफाईची कामे दिली जाणार आहेत. ४० ते ४५ कर्मचाऱ्यांचा एक एक ग्रुप करून कामांची विभागणी केली जाणार असून प्रत्येक कर्मचाऱ्याला प्रतीदिन किमान वेतनाप्रमाणे १०५० रुपये अदा केले जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.