* ईआरपी सेवा दीड वर्षे रखडली
* कंपनीला प्रशासनाकडून अभय?
ठाणे : ठाणे महापालिकेचे सर्व विभाग स्मार्ट करण्याबरोबरच कोणत्या विभागाने कोणत्या प्रकल्पासाठी किती बजेट प्रास्तवित केले, किती खर्च केले अशी सर्व माहिती सर्वच विभागांना एकाच वेळी संगणकीय प्रणालीद्वारे उपलब्ध करून देणाऱ्या ईआरपी प्रणालीबाबत पालिकेच्या वरिष्ठ पातळीवरच उदासीनता दिसून आली आहे.
ज्या कंपनीला हे काम देण्यात आले आहे त्या कंपनीने मुदत उलटूनही अद्याप ही सेवा सुरु केलेली नाही.विशेष म्हणजे संगणक विभागाने या कंपनीची हकालपट्टी करून दुसऱ्या कंपनीला हे कंत्राट द्यावे यासाठी वरिष्ठ पातळीवर गेल्या दीड वर्षांपासून पाठपुरावा करूनही संगणक विभागाच्या मागणीला केराची टोपली दाखवत संबंधित कंपनीची हकालपट्टी न करता याच कंपनीला अजूनही अभय देण्याचे काम वरिष्ठ पातळीवरून सुरु आहे. त्यामुळे पालिकेच्या वादग्रस्त विभागावर वॉच राहणार कसा ? असा प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे.
ईआरपी प्रणालीच्या माध्यमातून महापालिकेच्या विविध विभागामधील जसे घनकचरा, सार्वजनिक बांधकाम विभाग, आस्थापना, फायर, मालमत्ता, लेखापरीक्षण, कायदा, भांडार, सार्वजनिक बांधकाम, सुरक्षा, समाजकल्याण, पाणीपुरवठा विभाग, जन्ममृत्यू विभाग अशा विभागाचे काम स्मार्ट सिटी अंतर्गत अधिक स्मार्ट करत तंत्रज्ञानाचा वापर करून काम लवकर व सोयीस्कर होण्याच्या हेतूने हा ईआरपी प्रणालीची योजना हाती घेण्यात आली होती. या प्रकल्पाच्या अनुषंगाने महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या दृष्टिकोनातून एच.आर.एम.एस (मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली) हा महत्त्वाचा प्रकल्प या योजनेच्या मार्फत राबविण्यात येणार होता, पण गेल्या तीन वर्षात या प्रकल्पाचे काम केवळ पाच टक्केच झालेले असूनही पालिका याबाबत ठेकेदाराला कोणतीही विचारणा करत नसल्याचे दिसून येते.
संबंधित कंपनीला मार्च २०१९ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. त्यानंतर डिसेंबर २०१९ रोजी या कंपनीने काम पूर्ण करणे अपेक्षित असतानाही या कंपनीला अजूनही ही सेवा सुरु करता आलेली नाही. यासंदर्भात महापालिकेच्या संगणक विभागाने वरिष्ठ पातळीवर यासंदर्भात तक्रार करूनही याची दखल घेण्यात आलेली नाही. ही सेवा सुरु न झाल्याने संगणक विभागाला काम करताना अडथळे येत असून जर संबंधित कंपनी मुदत उलटूनही सेवा सुरु करत नसेल तर दुसऱ्या कंपनीला हे काम देण्यात यावे अशी मागणी संगणक विभागाच्या वतीने करण्यात आली होती. यासंदर्भात दीड वर्ष पाठपुरावा करूनही याकडे लक्ष देण्यात आलेले नाहीच मात्र अजूनही वरिष्ठ पातळीवर याच कंपनीला अभय देण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
ठाणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांचे वेतन हे तब्बल २८ वर्ष जुन्या फॉक्सप्रो या प्रणालीद्वारे अजूनही करण्यात येत आहे. नव्या ईआरपी प्रणालीद्वारे वेतन करण्याचा प्रयत्न केला गेला तेव्हा अनेक त्रुटी संगणक विभागाला आल्या असल्याचे सांगत संबंधीत कंपनीला यासंदर्भात पुरेसे ज्ञान नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यावेळी कर्मचाऱ्यांचे पगारही विलंबाने झाले होते .दुसरीकडे २८ वर्ष ही जुनी प्रणालीचे ज्ञान असणाऱ्या व्यक्ती देखील पालिकेकडे नसल्याने भविष्यात यासंदर्भात मोठी अडचण निर्माण होण्याची शक्यता आहे.
सध्या ठाणे महापलिकेच्या कर्मचाऱ्यांना जुन्या प्रणालीद्वारे वेतन दिले जात आहे. मात्र सातवा वेतन अयोग लागू करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाल्यास या जुन्या प्रणालीद्वारे हे वेतन कसे द्यायचे असा मोठा तिढा संगणक विभागासमोर आहे. हा तिढा लवकर सोडवला गेला नाही तर भविष्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी मोठी अडचण निर्माण होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.