डोंबिवलीत शिवसेनेच्या दोन गटात हाणामारी
डोंबिवली : शिवसेना पक्षाचा ताबा मिळविण्यासाठी शिवसेनेच्या दोन्ही गटात सध्या संघर्ष दिसत असून आज डोंबिवली मध्यवर्ती शाखेचा ताबा घेण्यासाठी शेकडोंच्या संख्येने शिंदे गटातील शिवसैनिक शाखेत घुसले.
शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे ४० आमदारांसह शिवसेनेतून बाहेर पडले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजप बरोबर युती करून मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतली. मात्र त्यानंतर शिवसेनेत ठाकरे आणि शिंदे असे दोन गट झाल्याचे निदर्शनास येत आहे. नेमकी शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू असतानाच डोंबिवली मध्यवर्ती शाखेत असणारे खासदार श्रीकांत शिंदे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे फोटो काढण्यात आले होते. आज हे फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे गटाची माणसे मध्यवर्ती शाखेत आली आणि त्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांना भिडले.
दुपारी 400 ते 500 जणांनी शिवसेना शाखेत घुसून शाखा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला शिवसैनिक, तरुण आणि पुरुष शिवसैनिक असे सगळ्याच वयोगटातील ठाकरे शिवसैनिक आणि शिंदे समर्थक आपआपसात भिडले. काही वेळाने रामनगर पोलिस या ठिकाणी पोहोचले. यावेळी दोन्ही बाजूच्या समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली आणि एकमेकांना शिवीगाळ करण्यात आली.
दोन दिवसांपूर्वी डोंबिवली पश्चिम येथील दीनदयाळ रोडवरील शिवसेना शाखेत ठाकरे गटातील शिवसैनिकांनी उद्धव ठाकरे यांचा शाखेतील बॅनरवर फोटो नसल्याने जाब विचारला होता. यामुळे वादविवाद झाल्यानंतर शाखाप्रमुख परेश म्हात्रे यांनी विवेक खामकर यांच्यावर 15 हजार रुपये चोरी केल्याची तक्रार पोलीस ठाण्यात केला होता. विष्णूनगर पोलिसांनी शहरप्रमुख विवेक खामकर यांना अटक केली होती. या घटनेत विवेक खामकर याना जामीन मिळाला आहे. यानंतर आज मंगळवारी शिंदे गट मध्यवर्ती शाखा ताब्यात घेण्यासाठी घुसले आणि हाणामारी झाली. या हाणामारीत प्रत्येकजण आपला दावा करीत होता.