ठाणे : ठाणे महापालिकेच्या विटावा येथील शाळेत असलेले कैद्यांचे क्वारंटाईन सेंटर अखेर बंद करण्यात आले आहे. शाळेत कैदी येत असल्याने बाल विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. हे सेंटर बंद झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकवर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
विटावा येथील ठाणे महापालिकेच्या शाळा क्र.७२ मध्ये कैद्यांसाठी विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला होता. त्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समोरच कैद्यांना या विलगीकरण कक्षात आणले जात होते. पोलीस आणि कैदी बघून शाळेतील विद्यार्थी अक्षरशः घाबरत होते. यासांदर्भात आंदोलन करण्याचा इशाराही पालकांनी दिला होता.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत शाळेचे रूपांतर कोविड सेंटर आणि विलगीकरण कक्ष अशा दोन भागात केले होते. गेल्या वर्षी ठाणे मध्यवर्ती कारागृहात कोरोना रुग्णांची संख्या मोठी होती. कारागृहातील अधिकारी, कर्मचारी यांनी घेतलेली काळजी तसेच बाहेरून येणाऱ्या नवीन कैदी अथवा न्यायबंदीला कोरोनाचा चाचणीच्या अहवाल शिवाय कारागृहात प्रवेश दिला जात नव्हता. बाहेरून येणारे नवीन कैदी अथवा न्यायबंदी (न्यायालयीन कोठडीतील आरोपी) यांचा कोरोना चाचणीचा अहवाल तपासला जात होता ज्या कैद्यांचे अथवा न्यायबंदीचे अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांची रवानगी कोविड सेंटरमध्ये केली जायची आणि ज्याचे अहवाल निगेटिव्ह असतील त्यांची रवानगी विलगीकरण कक्ष येथे १४ दिवसांसाठी केली जायची, १४ दिवसानंतर विलगीकरण कक्षेतील कैदी अथवा न्यायबंदीला कारागृहात प्रवेश दिला जात होता. तेथेही काही दिवस त्याला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले जात होते. पॉझिटिव्ह असलेल्या कैद्यावर शाळेतील कोविड सेंटरमध्ये उपचार करून त्याचा अहवाल निगेटिव्ह येईपर्यंत ठेवले जायचे.