३४ ठिकाणांना मिळणार झळाळी
ठाणे : गेल्या १५ दिवसांपासून ठाणे महापालिकेच्या जकात नाक्यासमोरील आनंद नगर हायवे आणि ठाणे महापालिका मुख्यालयाची इमारत विविधरंगी दिव्यांनी झळकत असल्यामुळे स्थानिक रहिवाशांसह, अनेक ठाणेकरांना या दोन ठिकाणी हमखास थांबून सेल्फी काढण्याचा मोह आवरत नाही.
असंख्य मनमोहक आणि रंगबेरंगी दिव्यांनी उजळलेल्या पार्श्वभूमीवर पालिकेचे मुख्यालय आणि आनंद नगर हायवे पाहताना अनेकांना वेळेचे भान राहत नाही, असे दृष्य दिसले.
ठाणे शहरातील किमान ३४ ठिकाणे विविध आकारांच्या आणि रंगांच्या लहान-मोठ्या दिव्यांनी उजळून निघणार असल्याने शहराचा एकदम कायापालट होणार असल्याची प्रतिक्रिया काही नागरिकांनी ‘ठाणेवैभव’कडे व्यक्त केली.
आनंदनगर हायवेवर असलेल्या पादचारी पुलावर लावलेल्या विविध रंगांच्या, आकाराच्या व शेकडो दिव्यांनी तेथील परिसर उजळून निघालाच असून, तेथील कामांची पूर्तता जवळ-जवळ होत आली आहे. लवकरच हा ‘एफओबी’ ठाणे महापालिकेच्या स्वाधिन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
‘शेठ मसूरकर कंपनी’द्वारे (एसएमसी) ठाण्यातील ३४ ठिकाणी विविधरंगी लहान-मोठे दिवे लावण्यात येणार असल्याने ठाणेकरांसाठीही औत्सुक्याचे आणि नवीन आकर्षक ‘स्पॉटस्’ तयार होणार आहेत आणि येत्या दोन-तीन वर्षां घोडबंदर रस्ता व परिसर उजळलेला दिसेल, असे पालिकेच्या एका अधिका-याने सांगितले. संबंधित ‘एसएमसी’ कंपनीने ठाणे महापालिकेसोबत ५ वर्षांचा करार केला आहे, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.
सुरुवातीस १० ठिकाणी कामांना सुरुवात होणार असल्याची माहिती सूत्रांनी ‘ठाणेवैभव’ला दिली. याचा सर्वप्रथम प्रारंभ आनंद नगर हायवे आणि महापालिका मुख्यालयापासून झाला असला तरी, काशिनाथ नाट्यगृहाचा परिसर, ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय, राज्य सरकारचे ठाणे जिल्हा नियोजन कार्यालय, ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती, कॅडबरी कंपनीसमोरील परिसर, लुईसवाडी, विव्हियाना मॉल व समोरील परिसर, विहंग हॉटेल भोवतालचा परिसर, आर मॉल, वागळे इस्टेट, जुने पासपोर्ट कार्यालय, माजिवाडा, घोडबंदर, नाशिककडे जाणारा हायवे आणि या शहरातील ६ ते ७ उड्डाणपुलांवरही अशीच नेत्रदिपक दिव्यांची रोषणाई करण्यात येणार आहे. जसजशी ही कामे होत जातील, तसतशी त्याचे आयुर्मान पाच वर्षांसाठी आहे.