निवडणुका निःपक्षपातीपणे झाल्या तरच लोकशाही निकोप राहू शकते. या विचाराशी बहुदा सत्त असलेला ते पक्ष आणि त्यांच्या निर्देशावर चालणारे अधिकारी सहमत
नसावेत. त्यामुळेच की काय मतदार याद्या बनवण्याच्या तांत्रिक कामात राजकारणाने शिरकाव के ला आणि अशा याद्यांबद्दल हरकतींचा पाऊस पडला! ठाणे, कल्याण डोंबिवली महापालिका, अंबरनाथ, उल्हासनगर अशा सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांत याद्यांचा घोळ झाला आहे. यामुळे निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची गणिते चुकणार आहेत. एक प्रकारे त्यांना लोकशाहीच्या मंदिरात प्रवेश देण्यापासून रोखले जाण्याचा प्रकार या सावळ्या गोंधळात दिसतो.
प्रभागांची रचना हा आणखी एक संशयास्पद विषय असतो. त्यात आरक्षणाचा रंग कालवला की संशय अधिकच गडद होतो. सर्वसाधारणपणे नेत्यांना ‘आपल्या’ माणसांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी लागते. त्यासाठी प्रभागांच्या सीमा सोयीनुसार बदलल्या जात असतात. त्याचे धडधडीत उदाहरण कडोंमपा क्षेत्रातील गणेश मंदिर प्रभागाचे देता येईल. अंतिम प्रभाग रचनेत मंदिरच गायब झाले आहे! सहाजिकच तेथील इच्छुक नगरसेवकाने हरकत मांडली. ही गोष्ट नजरचुकीने होत नसते, तर ती जाणूनबुजून के ली जाते असा संदेश जातो. निवडणूक खात्याच्या विश्वासार्हतेचा प्रश्न त्यामुळे निर्माण होत असतो. म्हणजे ज्या खात्याने लोकशाहीतील ही महत्त्वाची
प्रक्रिया निःपक्ष व्हावी यासाठी काळजी घ्यायची असते तेच संशयास्पद त्रुटी ठेवते की काय अशी शंका येऊ लागते. यामुळे या सर्व हरकतींचे शंका निरसन होणे गरजेचे आहे.
राजकारण स्पर्धात्मक होत चालले आहे, यात वाद नाही. प्रत्येकाला या क्षेत्रात येऊन काम करण्याची उर्मी वाटत असते. यामागे जनसेवेची तळमळ किती हा वादाचा
विषय ठरू शके ल. परंतु संशयाचा फायदा दिला तर त्यांच्या हरकती रास्त असतील तर त्याची दखल प्रशासनाला घ्यावीच लागेल. आठ ते दहा हजारांच्या छोट्या -छोट्या प्रभागात भावी नगरसेवक मनात इतकी भीती आणि अनिश्चितता बाळगत असतील तर त्यांनीही आपल्या क्षमतेचा पुनर्विचार करायला हवा. प्रभागाच्या रचनेमुळे आपण पराभवाच्या खाईत लोटले जाऊ अशी भीती बाळगणारे राजकीयदृष्ट्या कमकुवत असले पाहिजे. त्यांचा स्वतःवर आणि पक्षावर विश्वास नाही असाही अर्थनिघू शकतो. असे नगरसेवक प्रभागांच्या सीमांत गुंतून पडले तर शहराच्या व्यापक हिताचा विचार कधी करणार? हरकती-सूचनांचा विचार जरूर व्हायला हवा. पण उमेदवार मंडळींनी आपल्या लोकप्रतिनिधी संकल्पनेच्या कक्षा रुंदवायला हव्या. निवडणुकीला सामोरे जायचे तर अधिक आत्मविश्वासपूर्ण मानसिकतेने. हा खेळ कमकुवत आणि दबुळ्यांचा नक्कीच नाही!