कोणतं शहर पटकावणार ११ लाखांच्या पैठणीचा मान? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

महाराष्ट्रातील तमाम महिलांचा लोकप्रिय कार्यक्रम म्हणून होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे नाव घेतले जाते. गेल्या १८ वर्षांपासून अधिक काळ या कार्यक्रमाद्वारे तमाम वहिनींचा सत्कार आणि सन्मान केला आहे. झी मराठीवर होममिनिस्टर या कार्यक्रमाच्या महामिनिस्टर या नवीन पर्वाची लवकरच सांगता होणार आहे. या नवीन पर्वातील विजेत्या वहिनीला चक्क ११ लाखांची पैठणी भेट म्हणून मिळणार आहे. या ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस लागली आहे. यातील कोणतं शहर या पैठणीचा मान पटकावणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.

महिला वर्गात लोकप्रिय असलेला ‘होम मिनिस्टर’ हा कार्यक्रम १८ वर्षाहून ही जास्त काळ महाराष्ट्रातील, देशातील तमाम वहिनींचा सन्मान करत आला आहे. या कार्यक्रमाचं महामिनिस्टर हे पर्व तमाम वहिनींच्या भेटीस आलं आणि प्रचंड गाजलं. या ११ लाखांच्या पैठणीसाठी महाराष्ट्रातील १० शहरांमध्ये चुरस रंगली आहे. यात अहमदनगरच्या अपेक्षा पवार, पनवेलच्या सोनाली पाटील, ठाण्याच्या सुवर्ण पेंढारे, नाशिकच्या डॉ. रुपाली पाखरे, औरंगाबादच्या शरयू पाटील, रत्नागिरीच्या लक्ष्मी ढेकणे, पुण्याच्या कावेरी मत्रे, कोल्हापूरच्या सलोनी येवलेकर, सोलापूरच्या सपना रंगदाळ, नागपूरच्या निवेदिता गुरुभेले या वहिनींनी त्यांच्या शहरात १ लाखाच्या पैठणीचा मान मिळवला आहे.

त्यानंतर आता या १० जणींमध्ये ११ लाखांच्या पैठणीसाठी जबरदस्त सामना रंगणार आहे. येत्या रविवारी हा महाअंतिम सोहळा पार पडणार आहे. दरम्यान या पर्वाच्या सुरुवातीपासून ११ लाखांच्या पैठणीची चर्चा सर्वत्र सुरु होती. सोन्याची जर आणि हिरे जडवलेली ही पैठणी पाहण्याचा क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. कुठलं शहर या पैठणीचा मान पटकावणार? महाराष्ट्राच्या महापैठणीची मानकरी ठरणार कोणती नगरी? याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे.

येत्या रविवारी होणाऱ्या महाअंतिम सोहळ्यात प्रेक्षकांना हे पाहायला मिळेल. या महाअंतिम सोहळ्यानंतर सोमवार २७ जूनपासून होम मिनिस्टरच ‘खेळ सख्यांचा चारचौघींचा’ हे नवीन पर्व प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या पर्वात वहिनी त्यांच्या आवडत्या ग्रुप म्हणजेच महिला मंडळासोबत सहभागी होऊ शकतात.