ठाण्यातील नवीन सर्वेक्षण ग्राह्य धरले तर…
ठाणे : ठाण्यात ओबीसींच्या जनगणनेवर आक्षेप घेतले जात असतानाच शहरातील ओबीसींची संख्या अवघी एक लाख ४२ हजार म्हणजेच अवघी साडेदहा टक्के असल्याचे सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. ही जनगणना ग्राह्य धरली तर आधीच्या ३६ ऐवजी यंदा अवघे बाराच नगरसेवक निवडून येऊ शकतात.
ठाणे महापालिकेच्या गेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ओबीसी जनगणनेचे प्रमाण २७ टक्के एवढे असल्याने त्यावेळी जवळपास ३६ नगरसेवक ओबीसी प्रवर्गातून निवडून गेले होते. मात्र सध्याच्या ओबीसींच्या जनगणनेनंतर हे प्रमाण साडेदहा टक्क्यांवर आले आहे. ही गणना ग्राह्य धरली तर आगामी निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गातून ३६ ऐवजी अवघे १२ नगरसेवकच निवडून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर , भिवंडी या जिल्ह्यातील महापालिकांसह राज्यातील १४ महापालिकांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ठाणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत देखील जाहीर करण्यात आली आहे. मात्र ओबीसीचा आरक्षणाचा हा तिढा सोडवण्यासाठी संपूर्ण राज्यात ओबीसींचे सर्व्हेक्षण सुरु करण्यात आले.
ठाणे महापालिका क्षेत्रातही ओबीसीचे सर्व्हेक्षण करण्याचे काम युद्धपातळीवर घेण्यात आले. या सर्व्हेक्षणाची जबाबदारी बीएलओवर सोपवण्यात आली होती. सर्व बीएलओच्या हातात बूथनिहाय याद्या देऊन एका बूथमध्ये ९०० ते १२०० मतदारांची संख्या गृहीत धरण्यात आली होती. मात्र घरोघरी जाऊन केवळ तुम्ही ओबीसी आहात का ? हा एकच प्रश्न विचारून हे सर्व्हेक्षण पूर्ण करण्यात आले असल्याने या सर्व्हेक्षणावर संशय व्यक्त करण्यात येत आहे.
मतदार याद्यांच्या आधारे करण्यात आलेल्या या सर्व्हेक्षणातून ओबीसीची संख्या वाढेल आणि परिणामी ठाणे पालिकेत ओबीसी प्रवर्गातून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या देखील वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात गेल्या सार्वत्रिक निवडणूकीमध्ये २७ टक्के असलेली ओबीसींची संख्या सर्व्हेक्षणानंतर साडेदहा टक्क्यांवर आली आहे. यामध्ये १७ टक्क्यांनी घट झाल्याने यंदाच्या निवडणुकीमध्ये ओबीसी प्रवर्गामधून निवडून जाणाऱ्या नगरसेवकांची संख्या ही २४ ने कमी होऊ शकते.
सर्व्हेक्षण झाले कुठे ?
संपूर्ण ठाणे शहरात घरोघरी जाऊन बीएलओच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करण्यात आले असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला. मात्र अनेक ठिकाणी बीएलओ सर्व्हेक्षणासाठी गेलेच नसल्याचा आरोप आता होऊ लागला आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेतील माजी नगरसेवकांनी देखील आपल्याकडेही सर्व्हेक्षणासाठी कोणीच आले नसल्याचे सांगितले असल्याने ठाणे महापालिका क्षेत्रात झालेल्या या सर्व्हेक्षणाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.