भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावरून वाडा येथे जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील दागिने चाकूचा धाक दाखवीत बोगस पोलिसांनी पळविले.
गेल्या काही महिन्यापासून या महामार्गावर हि बोगस पोलिसांची टोळी कार्यरत असून या कडे ठाणे आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील पोलिसांचे दुर्लक्ष्य होत आहे.
भिवंडी शहर आणि परिसरातील गुन्हेगारी सातत्याने वाढत आहे. वाडा तालुक्यातील चिंचघर गावात राहणारी महिला स्मिता पाटील (६३) ह्या रविवारी सकाळी सव्वा अकरा वाजता मुंबई-नाशिक महामार्गावरून घरी जात असताना अचानकपणे दुचाकीवरून आलेल्या दोघांनी रिक्षा अडवून चालकाकडे रिक्षाची कागदपत्रे मागितली. ती कागदपत्रे रिक्षा चालक दाखवीत असताना दुचाकीस्वाराच्या साथीदाराने महिलेला चाकू दाखवत स्मिता यांच्या गळ्यातील दीड लाखाचे दागिने जबरीने खेचून घेऊन पळून गेला.
या अचानक घडलेल्या घटनेने स्मिता पाटील यांनी कोनगाव पोलीस ठाणे गाठून बोगस पोलीस बनून दागिनेल पळविल्याची तक्रार नोंदविली. या घटनेने परिसरात खळबळ माजली असून या प्रकरणी पोलिसांनी या मार्गावर दिवस गस्त करावी,अशी मागणी जोर धरू लागली आहे.