होम प्लॅटफॉर्मवरील लोकलच्या थांब्यात बदल

अंबरनाथच्या रेल्वे प्रवाशांना दिलासा

अंबरनाथ : अंबरनाथला नव्याने बांधण्यात आलेल्या होम प्लॅटफॉर्मवरील लोकल थांब्याच्या जागेत बदल करून तो मागे घेतल्याने प्रवाश्यांना दिलासा मिळाला आहे.

नव्या प्लॅटफॉर्मवर बदलापूरच्या दिशेने जाणाऱ्या लोकलचे अडीच डबे पुढे जात असल्याने होम प्लॅटफॉर्मवरून गाडी पकडणे अथवा सोडणे प्रवाश्यांना धोकादायक झाले होते.

अंबरनाथ रेल्वे स्थानकामध्ये प्रवाश्यांच्या सोयीसाठी  प्लॅटफॉर्म एकच्या बाजूला होम प्लॅटफॉर्म बांधण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी होम प्लॅटफॉर्म प्रवाश्यांसाठी खुला करून देण्यात आला आहे. मात्र होम प्लॅटफॉर्मच्या बाजूला लोखंडी कठडे उभारण्यात आले होते.त्यामुळे दोन्ही दिशेला फलाट असूनही पहिल्या अंदाजे दोन डब्यातील प्रवाश्यांना होम फलाटाचा वापर करणे अशक्य झाले होते. पूर्वीच्या फलाट एकवर  प्रवाश्यांची उतरण्याची सोय केल्याने होम फलाटावरून गाडी पकडताना आणि सोडताना प्रवाश्यांना धोक्याचे झाले होते. गाडी पकडताना प्रवासी किरकोळ जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या.

अंबरनाथ रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांशी चर्चा  करताच याबाबत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यव्हार सुरु असून लोकलचा थांबा कल्याणच्या दिशेकडे मागे घेण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

अखेरीला ४ जूनपासून प्लॅटफॉर्मवरील थांबा मागे घेण्यात आल्याने प्रवाश्यांना गाडी पकडणे आणि सोडणे सोपे जाणार आहे. फलाटावरील झालेल्या बदलाबाबत प्रवाश्यांना तशी आगाऊ माहिती देण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.