भाजपाचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांचा आरोप
ठाणे : ठाणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने अंतिम केलेल्या प्रभाग रचनेत विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. महापालिकेच्या ३३ प्रभागांपैकी २१ मधील लोकसंख्येत बदल केले असताना, केवळ दिवा येथे प्रभागामध्येच एका नगरसेवकाची वाढ कशी झाली, असा सवाल भाजपाचे महापालिकेतील माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी केला आहे.
यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाकडून फेब्रुवारीमध्ये प्रभागरचना जाहीर करण्यात आली होती. त्यावेळी ठाणे महापालिका क्षेत्रातील केवळ १८ टक्के लोकसंख्या असलेल्या मुंब्रा येथे ४ प्रभाग वाढविले होते. तर ८२ टक्के प्रभाग असलेल्या ठाण्यात सात नगरसेवक वाढले होते. त्यात वागळे इस्टेटमधील पाच जागांचा समावेश होता. या प्रभागरचनेला भाजपाने आक्षेप घेतला होता. आता दुसऱ्या वेळी प्रभागरचना निष्पक्षपातीपणे होण्याची अपेक्षा होती. मात्र, या वेळीही विशिष्ट पक्षाला अनुकूल भूमिका घेतली गेली आहे. अचानक दिवा येथील प्रभाग ५७ हजार लोकसंख्येवरून ३५ हजारांपर्यंत कमी केला गेला. तर मुंब्रा येथील प्रभाग ३६ हजारांवरून ४९ हजारांचा झाला. जुन्या प्रभाग रचनेत मुंब्र्यातील दोन प्रभागांमध्ये ७१ हजार लोकसंख्या होती. आता नव्या रचनेत ती ८० हजारांवर पोचली गेली. घोडबंदर रोडवर लोकसंख्या वाढत आहे. मात्र, या ठिकाणी एकही नगरसेवक वाढला नाही, याबद्दल माजी गटनेते मनोहर डुंबरे यांनी आश्चर्य व्यक्त केले. केवळ दिवा परिसरातच नगरसेवक कसा वाढला, याकडे श्री. डुंबरे यांनी लक्ष वेधले.