सरस्वती विद्या संकुलाच्या प्रांगणात सजली तारांकित संध्या

ठाणे : कोरोना महामारीच्या विळख्यात दोन वर्षे प्राण घुसमटून आणि अनेक दुःख पचवून आज पुन्हा एकदा विश्वाची विस्कळीत घडी सावरत असताना ठाण्यातील सर्वच नागरिकांना चिरपरिचित असणाऱ्या नौपाड्यातील सरस्वती मंदिर ट्रस्ट विद्यालयाच्या प्रांगणात ३० एप्रिल २०२२ रोजी एक पारितोषिक समारंभ आयोजित करण्यात आला.

सध्या उष्मातिरेकाने मेटाकुटीस आलेल्या सर्वांनाच चांदण्यांनी रत्नजडीत आभाळाची साथ लाभली ती शाळेच्या प्रांगणातील तारांकित संध्या या कार्यक्रमाची. या ठिकाणी मान्यवर अतिथी व पारितोषिक विजेत्या विद्यार्थ्यांसाठी शाळेच्या सर्वच विश्वस्त, शिक्षक, व्यवस्थापन मंडळ व विद्यार्थ्यांनी केलेली सजावट व त्यांच्या उत्साहाने निर्माण झालेले वातावरण अभूतपूर्व आनंद देणारे होते. कला, क्रीडा व शिक्षण अशा विविध क्षेत्रांत अद्वितीय कामगिरी बजावलेल्या तारकांचे कौतुक करण्यासाठी आणि असेच नवनवीन तारे या विद्यामंदिराच्या माध्यमातून निर्माण व्हावेत या दृढ संकल्पाने हा कार्यक्रम साकारण्यात आला.

एक हृदयस्पर्शी आरंभ

या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थित राहिलेल्या ११ मान्यवर अतिथींचे व तारांकित आणि तेजांकितच्या पारितोषिक विजेत्यांचे स्वागत शाळेच्या एनसीसी कॅडेट्सद्वारे सैनिकी इतमामाने करण्यात आले. या मानवंदनेनंतर स्वागत गीत, ईशस्तवन झाले व ललित कला अकादमीच्या शिष्या व त्यांच्या गुरूंने नृत्यकलेच्या माध्यमातून श्री गणेशाचे आशीर्वाद मिळावेत या साठी बाप्पाला आपल्या मनमोहक नृत्यातून आवाहन केले. या नंतर एक एक करून मान्यवर अतिथींना व्यासपीठावर आमंत्रित करून विजेत्यांना पारितोषिके व प्रशस्तीपत्रे देऊन गौरविण्यात आले.

तेजस्वी तारे

शैक्षणिक वर्षे २०१९ – २० व २०२० – २१ मध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांना तारांकित अशी उपाधी प्रदान करण्यात आली तर या आधीच तारांकित या उपाधी ने गौरविण्यात आलेले विद्यार्थी ज्यांनी या दोन वर्षात देखील उल्लेखनीय कामगिरी बजावली अशांना तेजांकित ही उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.

दोन शब्द मोलाचे

या कार्यक्रमास उपस्थित गणमान्य अतिथी सुजाता भिडे, संजय धुमाळ, संदीपन रेड्डी, राजश्री कोर्डे, प्रसाद मथुरे आदींनी कला व विज्ञान या क्षेत्रातील भारताचा इतिहास व आपल्याला लाभलेला हा वारसा आज देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वृद्धीचा व भारताच्या प्रगतीचा खंबीर कणा कसा बनला आहे, या बद्दल सांगून सर्वांना प्रोत्साहित केले. या सर्वच मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बहुमोलाचा सल्ला देत सांगितले की आपल्याकडे अनेक क्षेत्र उपलब्ध आहेत ज्यात विद्यार्थी ज्ञान प्राप्त करून प्रगती करू शकतात. त्यांचा सल्ला हा विद्यार्थ्यांना दिलेला जणू एक मंत्रच होता की पंख पसरून गरूडभरारी भरा; अवसर नावाचे गगन अनंत आहे आणि त्यात गरुड बनून तुम्ही आपली छाप बनवू शकता.

या कार्यक्रमास संस्थेच्या विश्वस्त मंडळाचे सौ. व श्री. दिघे, सौ. व श्री. दामले, सौ. व श्री. टिळक, श्री. सहानी, श्री. जंगले तसेच विद्यमान व माजी मुख्याध्यापक/मुख्याध्यापिका व समस्त कर्मचारी वर्ग या सर्वांची उपस्थिती लाभली. या क्षणी सर्वच मान्यवरांनी नवोदित तारकांना आपले शुभाशीर्वाद दिले.