* कल्याण-डोंबिवलीत राष्ट्रवादीला बळकटी
* गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत केला प्रवेश
कल्याण : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची निवडणूक कधीही लागू शकते. त्यामुळे राष्ट्रवादीने पक्ष मजबूत करण्याचे काम सुरू केले आहे. याच धर्तीवर कल्याण आणि कल्याण ग्रामीणमधील माजी नगरसेवकांना आज राष्ट्रवादी पक्षात प्रवेश देण्यात आला. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला.
कल्याण-डोंबिवलीमधील माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील, माजी भाजपा नगरसेविका सुनीता खंडागळे, एमआयएम माजी नगरसेविका तांजिला मौलवी, शिवसेना नगरसेविका उर्मिला गोसावी, माजी नगरसेवक फैजल जलाल आणि ठाणे जिल्हा एमआयएमचे अध्यक्ष आयाज मौलवी यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. हा प्रवेश मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झाला.
यावेळी माजी खा. आनंद परांजपे, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्यासह कार्याध्यक्ष वंडार पाटील, निरीक्षक प्रमोद हिंदुराव, प्रवक्ते महेश तपासे, रेखा सोनवणे, रामदास वळसे पाटील, सुजित रोकडे आदी उपस्थित होते.
अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांचा प्रवेश आज राष्ट्रवादी झाल्याने कल्याण ग्रामीणमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. तर एमआयएमच्या पदाधिकारी यांचा प्रवेश केल्याने कल्याण पश्चिम मध्ये राष्ट्रवादी ताकत वाढण्यासाठी मदत होणार आहे. एकीकडे शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडत असताना दुसरीकडे आता राष्ट्रवादीने सुद्धा हम किसेसे कम नही असा संदेश दिला आहे.