रेन वॉटर हार्वेस्टिंगचे वावडे; पाणीप्रश्नाचे भिजत घोंगडे

* १० वर्षांत फक्त १५१३ गृहसंकुलांनी बसवले प्लांट
* ठामपाकडे नाही प्रणाली तपासणारी यंत्रणा

ठाणे : ठाण्यात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत असताना रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याबाबत गृहसंकुले स्वारस्य दाखवत नसल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे ठाणे महापालिकेकडेही असा प्रकल्प इमारतींवर बसवण्यात आलेला आहे की नाही हे तपासण्याची यंत्रणाच नाही. गेल्या १० वर्षात ठाण्यातील केवळ १५१३ इमारतींवर ही प्रणाली बसवण्यात आली असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

ठाणे शहरात गेल्या काही वर्षात बेसुमार शहरीकरण झाले आहे . यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती उभ्या राहिल्या आहेत. विशेष करून घोडबंदर पट्ट्यात मोठ्या संख्येने इमारती उभ्या राहिल्या असून आजही अनेक गृहसंकुलांना टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. पाणी टंचाईच्या संदर्भांत न्यायालयात टाकण्यात आलेल्या याचिकेमध्ये जोपर्यंत शहराला पुरेसे पाणी मिळेल अशी व्यवस्था होत नाही तोपर्यंत एकाही बांधकामाला परवानगी देऊ नये असे आदेशच न्यायालयाने ठाणे महापालिकेला दिले होते . त्यानंतर शहराला २०२५ पर्यंत पाणी पुरवठा होईल असे प्रतिज्ञापत्र ठाणे महापालिकेने कोर्टात दाखल केले असले तरी आता भविष्यात पाणी टंचाईचे संकट दाट होणार असल्याने रेन हार्वेस्टिंग प्रकल्पावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

२००६ नंतर गृहप्रकल्पांना मंजुरी देताना सोसायटीमध्ये रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये काही इमारतींनी रेन हार्वेस्टिंगचे प्रकल्प राबवण्यास सुरुवात देखील केली होती. २०१० पासून ते २०२१पर्यंत एक हजार ५१३ इमारतींमध्ये रेन हार्वेस्टिंग प्लांट बसवण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. नवीन गृहसंकुल बांधण्यासाठी ज्यावेळी ठाणे महापालिकेकडे मंजुरी घेतली जाते त्यावेळी सुरुवातीलाच रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प आहे कि नाही हे पहिले जाते. त्यानंतर मात्र हे प्रकल्प सुरु आहेत की नाहीत हे तपासणारी यंत्रणाच नसल्याने ठाणे महापालिकेकडून केवळ सोपस्कार पाळले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पर्यावरण तज्ञांच्या म्हणण्यानुसार ठाणे महापालिकेकडे केवळ १,५१३ इमारतींचा रेकॉर्ड आहे असे गृहीत धरले तरी ठाण्यात ८० टक्के इमारती अनधिकृत असल्याने या इमारतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबवला जात नसणार हे उघड आहे. जर पालिकेच्या रेकॉर्डप्रमाणे एवढ्या इमारती रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या माध्यमातून पाणी बचत करत असतील, २००७ पासून आतापर्यंत एवढ्या वर्षांपासून पाण्याचा वापर कमी झाला असेल तर तसा रेकॉर्डही ठाणे महापालिकेने ठेवायला हवा,, अन्यथा रेन वॉटर हार्वेस्टिंगमुळे पाण्याची किती बचत झाली हे समजणे शक्य होणार नाही, असे मतही तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

सद्य:स्थितीत पाणी प्रश्नाचे गांभीर्य वाढत चालले आहे. दिवसेंदिवस हा प्रश्न बिकट होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगच्या संदर्भात धोरण आखण्याचा निर्णय घेतला होता. पावसाळ्यामध्ये पावसाचे वाया जाणारे पाणी वर्षा जलसंचयनच्या माध्यमातून हे पाणी अडविल्यास निश्चितपणे जमीनीतील पाण्याची पातळी वाढविण्यास मदत होईल. त्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात जुन्या इमारतींमध्ये ही योजना कशी राबविता येईल, त्यासाठी काय अतिरिक्त सुविधा देती येतील त्याचबरोबर नवीन विकास प्रस्तावांना मंजुरी देताना काय सुविधा देता येतील याबाबत काय करता येईल याबाबत धोरण बनविण्यात येणार होते. मात्र या धोरणालाही अद्याप मुहूर्त मिळालेला नाही.

वर्ष : रेन हार्वेस्टिंग प्रकल्प राबवणाऱ्या इमारतींची संख्या

२०१२-१३ : १८५
२०१३-१४ : २१२
२०१४-१५ : १५७
२०१५-१६ : १७९
२०१६-१७ : ५५
२०१७-१८ : ३५९
२०१८-१९ : १८३
२०१९-२०: १४०
२०२०-२१: ४३