ठाणे पूर्वेला क्लस्टरचे वेध; साईनाथनगरमध्ये सर्वेक्षण सुरू

ठाणे : ठाणे पश्चिमेकडील भागात सिडकोच्या माध्यमातून क्लस्टर योजनेचा श्रीगणेशा करण्यात येत असतानाच आता ठाणे पूर्वेलाही क्लस्टरचे वेध लागले आहेत. कोपरीतील साईनाथनगर झोपडपट्टी परिसरात युद्धपातळीवर घरांचे सर्व्हेक्षण सुरु आहे.

ठाण्यातील धोकादायक अनधिकृत इमारतींमध्ये  राहणाऱ्या रहिवाशांना सुसह्य घर देणाऱ्या क्लस्टर या महात्वाकांक्षी योजनेसाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. क्लस्टर योजनेला युतीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली.तर ६ फेब्रुवारी २०२० रोजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याहस्ते भूमीपूजन करण्यात आले.त्यानुसार,गेली दोन वर्षे ठाणे पश्चिमेकडील नागरिकांचे बायोमेट्रीक घेणे, याद्या तयार करणे, सहमती पत्रे, संक्रमण शिबीरे आदी कामे महापालिकेकडुन सुरु करण्यात आली आहेत. सिडकोकडून या प्रकल्पातील किसननगर येथील क्लस्टर योजनेत सहभागी होण्यासाठी स्वारस्य दाखवण्यात आल्यानंतर नुकताच सिडको आणि ठाणे महापालिकेतील सामंजस्य करारदेखील झाला.

ठाणे पश्चिमेकडील बहुतांश झोपडपट्टी परिसरात क्लस्टर योजनेंतर्गत सव्हेक्षण पूर्ण झाले असताना आता ठाणे पूर्वेकडील कोपरी भागातही क्लस्टर योजनेचे वेध लागले आहेत. कोपरीतील ठाणे रेल्वे स्थानकालगतच्या साईनाथनगर परिसर झोपडपट्टी बहुल असुन या भागातील इमारतीही जुन्या व मोडकळीस आल्या आहेत. तेव्हा, कोपरीचा सुनियोजित आणि सुनियंत्रित विकास करण्यासाठी शुक्रवारपासून ठाणे महापालिकेकडून घरोघरी सर्व्हेक्षण केले जात आहे. यात कुटुंबाची आणि राहत्या जागेची अचूक माहिती घेतली आहे. त्याचबरोबर सध्याच्या बांधकामाचे स्वरूप आणि त्यातील रहिवाशांची नोंदही घेतली जात असुन रहिवाशांची अचूक आणि निःपक्षपाती माहिती गोळा केली जात आहे. भविष्यातील घरे, रस्ते, सेवा सुविधा, कशा प्रकारे उपलब्ध करता येतील आणि जागेचा वापर कशा पद्धतीने करता येईल. याचा आराखडा तयार केला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.