कळवा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी; ६ लाखांचा मुद्देमाल जप्त
ठाणे : दिवसाढवळ्या फेरीवाले बनून एखाद्या ठिकाणची रेकीच्या सहाय्याने माहिती घेऊन घरफोड्या करणाऱ्या टोळीचा कळवा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या आरोपींकडून सहा लाखांचा मुद्देमालही पोलिसांनी जप्त केला आहे.
मनिषा नगर कळवा येथे राहणाऱ्या स्मिता मालवणकर यांच्या घरी २५ जानेवारी रोजी दुपारच्या वेळेत फेरीवाले बनून दोन तरुण घराची रेकी करत होते. चोरी करण्याच्या उद्देशाने हे तरुण रेकी करत असल्याचे सी.सी.टि.व्ही. फुटेजमध्ये आढळून आले. रेकी करून झाल्यानंतर दुपारी १२ ते १ च्या दरम्यान घरातील वातावरण पाहून हे चोर चोरी करून फरार झाले. या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली आहे तर ह्या टोळीतील एक महिला आरोपी फरार आहे. दिवसा फेरीवाले बनून एखाद्या ठिकाणाची रेकी करून माहिती घेऊन त्या ठिकाणी कोणी नसल्यास चोरी करण्याचा प्रयत्न हे तरुण करत होते. सध्या इझी मनी कमविण्याच्या नादात चोरी सारख्या घटना वारंवार समोर येत आहेत. हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली आहे अशी माहिती कळवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी दिली.
सहा लाख किंमतीचे बारा तोळे सोने असा मुद्देमाल त्यात सोन्याची चैन, अंगठ्या, मंगळसूत्र, गंठण अशा प्रकारचा मुद्देमाल कळवा पोलिसांनी हस्तगत केला आहे. विशेष म्हणजे या गुन्हेगारांचा शोध गेली अनेक दिवस सुरू होता. मात्र हे चोर वारंवार आपला ठिकाणा बदलत होते. पण तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या चोरट्यांना पालघर येथुन अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही यशस्वी कामगिरी अप्पर पोलिस आयुक्त अनिल कुंभारे, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे, सहायक पोलिस आयुक्त व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक मनोहर आव्हाड, गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक सुदेश आजगावकर, गुन्हे शाखा उप निरीक्षक के.एस.बघडाणे, एम.पी.महाजन, संजय गावंडे, रामराजे, शिंदे, महाडिक, गुरव, खपाले, माळी, साठे यांच्या संपूर्ण टिमने विशेष मेहनत घेऊन केली असून अधिक तपास उपपोलिस निरिक्षक के.एस.बघडाणे करीत आहेत.