मोटागाव माणकोली पुलाचे ९४ टक्के काम पूर्ण

ठाणे : उल्हास खाडीवरील आगामी सहा मार्गिका असलेल्या मोटागाव- माणकोली पुलाच्या कामाच्या प्रगतीचे पाऊल गतीने पडत असून कामाची प्रगती तब्बल 94.21 टक्के झाली. हे काम जवळपास पूर्ण होत आले आहे, अशी माहिती मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली.
या पुलाच्या कामांसंबंधी तांत्रिक कामे लवकरच हातावेगळी होणार असल्याने एक्स्पाशन जॉईंट, फेंडर वॉल, वॉटर स्प्राऊट, मरीन फौना आदी कामेही होत आली. डोंबिवली भिवंडीला जोडणारा मोटा गाव-माणकोली पूल या महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. वाहनांना जाण्याकरीता बिटुमन टाकण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. त्यानंतर लेन मार्किंग व संबंधित कामे केली जाणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
मोटागाव-माणकोली पूल सुरू झाल्याने सध्याच्या दोन मार्गावरील वाहनांची वर्दळही कमी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा पूल सुरु झाल्यानंतर प्रवासाचा वेळ सध्याच्या एका तासावरून केवळ 15 मिनिटांपर्यंत कमी होईल. डोंबिवली ते भिवंडी, ठाणे, मुंबईपर्यंतचा प्रवास करणा-या प्रवाशांना आणि शेकडो वाहन चालकांना दिलासा मिळेल. त्यांचा दररोजचा प्रवास उल्हास खाडीवरून जाणार आहेच शिवाय आणि एकूणच रस्त्याचे अंतरही कमी करणार आहे.
या नव्या मार्गावरील प्रवासाचे अंतर सुमारे 27 कि.मी कमी करण्यासाठी पुलाची रचना करण्यात आली आहे. सध्या ठाणे किंवा मुंबईकडे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला डोंबिवलीमार्गे शिळफाटा ते मुंब्रा ते ठाणे आणि नंतर मुलुंडनंतरचा आहे. पर्यायी मार्ग डोंबिवली ते कल्याण ते भिवंडी बायपास आणि नंतर मुंबईच्या दिशेने जाणारा राष्ट्रीय महामार्ग 3 आहे. तत्पूर्वी, एमएमआरडीएने एप्रिल 2023 ची पूर्ण करण्याची अंतिम मुदत निश्चित केली होती. या प्रकल्पावरील बांधकामाचे काम फेब्रुवारी 2017 मध्ये होणार होते. मात्र सन 2019 च्या मध्यापर्यंत नियोजित मुदतीसह परत सुरू झाले आहे.