ठाणे : मासुंदा तलावाच्या सुशोभीकरणासाठी या आधीच कोट्यवधींची उधळपट्टी झाली असतानाच आता एकट्या रायलादेवी तलावाच्या सुशोभीकरणासाठी एमएमआरडीए आणि ठाणे महापालिकेच्या वतीने ५२ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे.
गेले अनेक वर्ष लालफितीत अडलेल्या रायलादेवी तलावाचे अखेर सुशोभीकरणाला अखेर चालना मिळाली असून ठाणे महापालिका आणि एमएमआरडीए यांच्यावतीने या तलावाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी हा तलाव ठाणे महापालिकेच्या ताब्यात घेण्याची प्रक्रिया देखील सुरु करण्यात आली आहे. मात्र या तलावाच्या सुशोभीकरणासाठी तब्बल ५२ कोटींचा खर्च करण्यात येणार असून यामध्ये ठाणे महापालिका १२ तर एमएमआरडीए ३९ कोटींचा खर्च करणार आहे. ठाण्यात मासुंदा तलावाच्या संवर्धनासाठी यापूर्वीच कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. आता रायलादेवी या एका तलावाच्या सुशोभीकरणासाठी ५२ कोटींचा खर्च कशाला यावरून उलट-सुलट चर्चा सुरु झाली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून दुर्लक्षित असलेला ठाण्यातील रायलादेवी तलाव आता खऱ्या अर्थाने कात टाकणार आहे. या तलावासाठी महापालिकेच्या माध्यमातून आठ कोटींच्या आसपास खर्च केला होता. त्यात संरक्षक भिंत आणि तलावातील गाळ काढण्यात आला होता.
२०१९-२० मध्ये हे काम महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले होते. एमआयडीसी आणि ठाणो महापालिका यांच्या तांत्रिक वादामध्ये अडकलेल्या रायलादेवी तलावावातून तब्बल १५ वर्षांनी गाळ काढल्यानंतर आता या तलावाचे व्यापक स्वरु पात संवर्धन आणि सुशोभिकरणाची योजना पालिकेने आखली होती. परंतु हा तलाव एमआडीसीच्या ताब्यात असल्याने पालिकेकडून करण्यात येणाऱ्या खर्चावर वारंवार आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे हा तलाव पालिकेच्या ताब्यात मिळावा अशी अपेक्षा होता. त्यानुसार आता हा तलाव पालिकेकडे हस्तांतरीत करण्यात आला आहे, परंतु आता या तलावाचे सुशोभिकरणाचे काम महापालिका नाही तर एमएमआरडीएकडून केले जाणार आहे. त्यानुसार तलावाच्या बाजूने हरीतपट्टा तयार करण्यात येणार आहे. तलावात पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढवण्याबरोबरच पाण्याची गुणवत्ता सुधारणे हा या संवर्धनामागचा मुख्य हेतू ठेवण्यात आला आहे. विसर्जनासाठी या ठिकाणी कायमस्वरूपी कृत्रिम तलावाची निर्मिती करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
या तलावाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ३९.२९ कोटींचा खर्च केला जाणार आहे. यामध्ये संकल्प चौक व परिसराचे सुशोभिकरणाअंतर्गत खुल्या रंगमंचाचे नुतणीकरण, बहुउद्देशीय सभागृह, आकर्षक कुंपण भिंत, रेलिंग्स, लॉन आदींची कामे केली जाणार आहे. त्यानुसार यासाठी ३९.२९ कोटी एवढा अपेक्षित धरण्यात आला आहे. हे काम महापालिकेच्या माध्यमातून केले जाणार असले तरी त्यावर होणारा खर्च एमएमआरडीएकडून घेतला जाणार असल्याचे पालिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. परंतु एका तलावावर एकूण ५२ कोटींचा खर्च केला जाणार असल्याने त्याबाबत मात्र आश्चर्य व्यक्त होत आहे.