मुंब्रा, कळवा आणि खारीगाव भागात २९ कोटींची विकासकामे

खा. डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन

ठाणे: कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते रविवारी मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघातील एकूण २९ कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन पार पडले. यामध्ये मुंब्रा, कळवा, खारीगाव या भागातील रस्ते काँक्रीटीकरण, जलवाहिनी टाकणे, शौचालयांची उभारणी, विसर्जन घाट, अभ्यासिका या विकासकामांचा भूमिपुजन करण्यात आले.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या खासदार विशेष निधीतून ही विकासकामे मार्गी लागणार आहेत. यावेळी डोंबिवली येथे वातानुकूलित अभ्यासिकेचे आणि वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.

कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे संपूर्ण मतदारसंघात विविध विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत असल्याने अनेक विकासकामेमार्गी लागत आहे. यामध्ये कल्याण डोंबिवली शहरात महानगर गॅसची पाईपलाईन टाकणे, जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात पाण्याची सुविधा उपलब्ध करणे, अंबरनाथ येथील मंदिर परिसराचा विकास करणे यांसारखे अनेक विकास कामे लोकसभा मतदारसंघात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू आहेत. याबरोबरच आता कल्याण लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मुंब्रा कळवा येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे. यामध्ये ठाणे कळवा येथील उड्डाणपुलाचे मास्टिक पद्धतीने डांबरीकरण करणे यासाठी ४ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

खारीगाव परिसरातील विविध रस्त्यांचे ५ कोटी रुपयांचे निधीतून काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. तर पारसिक नगर येथील दशक्रिया विधी जेट्टी दुरुस्ती करणे, खुला रंगमंच उभारणे आणि जलवाहिनी टाकणे या कामांसाठी ३.४३ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून या कामांचेही यावेळी भूमिपूजन करण्यात आले. याबरोबरच घोलाई नगर परिसरातील रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण करणे, शौचालय उभारणे, जलवाहिनी टाकणे, यांसारख्या विविध विकास कामांसाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून ही कामे देखील लवकरच पूर्ण होणार आहेत. तर मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात २५ लाख रुपये खर्च करून गणेश विसर्जन घाट तयार करण्यात आला आहे. त्याचे देखील लोकार्पण करण्यात आले. याबरोबरच मुंब्रा शहरातील विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ८.१७ कोटी रुपयांचा निधी मिळाला असून याचे आणि इतर विकासकामांचेही यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले.

या बरोबरच डोंबिवली येथील ह.भ.प. संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडासंकुल मधील सुसज्ज अशा टेबल टेनिस कोर्टचे आणि डोंबिवली (पश्चिम) रेल्वे स्थानक परिसर येथे असलेल्या डोंबिवली ग्रंथ संग्रहालय येथे वातानुकूलित अभ्यसिकेचे लोकार्पणही करण्यात आले. यावेळी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.