कल्याणात लोकलमध्ये आढळलेल्या बॅगमध्ये २० लाखांची रोख

मुंबई : मुंबईतून कसारा स्थानकादरम्यान धावणाऱ्या कसारा-सीएसएमटी लोकलमध्ये एक बेवारस बॅग सापडली असून त्यामध्ये तब्बल 20 लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे. कल्याण स्थानकात लोकलमधील काही प्रवाशांनी ही बॅग पोलिसांकडे सोपवल्यानतंर बॅगेत रोकड असल्याचे दिसून आले.

मुंबईतील सीएसएमटी स्थानकाहून कसाराकडे निघालेली लोकल कल्याण रेल्वे स्थानकात रात्री 11 वाजता पोहोचली. त्यावेळी, प्रवाशांच्या सांगण्यावरुन पोलिसांनी बेवारस बॅग ताब्यात घेतली असता, ती बॅग पैशांनी भरेलली होती. या बॅगेत 20 लाखांची रोकड सापडली असून 500 रुपयांच्या नोटांचे 7 बंडल्स आहेत. तसेच, ही रीबॉक कंपनीची बॅग असून औषधांचा बॉक्सही बॅगेत आढळून आला आहे. प्रवाशांना ही बेवारस बॅग आसनगाव रेल्वे स्थानकात सापडली होती, त्यांनी ती पोलिसांच्या ताब्यात दिली. कल्याण जीआरपी पोलिसांनी पंचनाम्याद्वारे बॅग जप्त केली असून मूळ मालकाचा शोध सुरू आहे.