दोषी कंपन्यांना टाळे ठोकण्याचा शिवसेनेचा इशारा
अंबरनाथ : अंबरनाथमध्ये होणारे प्रदूषण थांबवा, नागरिकांना मोकळा श्वास घेऊ द्या, या मागणीसाठी स्वाक्षरी मोहीम राबवून प्रदूषणासारख्या गंभीर विषयाकडे नागरिकांनी लक्ष वेधून घेतले
शहरातील प्रदूषणाची वाढती समस्या रोखण्यासाठी शिवसेना आक्रमक झाली असून नागरिकांच्या हितासाठी तीव्र लढा देऊन प्रदूषणमुक्त शहर करण्याचा निर्धार शिवसेनेने दिला.
अंबरनाथमध्ये मागील आठवड्यात एका रासायनिक कंपनीतून वायूगळती झाली होती, त्यामुळे नागरिकांना त्रास झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ रविवार (२२) रोजी पूर्वेकडील बी केबिन मार्गावर निसर्ग ग्रीन परिसरात शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या नेतृत्वाखाली स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली होती. स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. प्रदूषणाचा त्रास किती दिवसांत बंद करणार ते सांगा अन्यथा कंपनीला टाळे ठोकू,असा इशारा त्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिला.
सामाजिक कार्यकर्ते सलील जव्हेरी, माजी नगरसेवक ॲड. संदीप भराडे तसेच योगेश चलवादी, विशाल गायकवाड आदींनी प्रदूषणाच्या त्रासाबाबत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रदूषण करणाऱ्या दोषी कंपन्यांवर कारवाई करण्याच्या मागणीने जोर धरला. लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्याचे विशाल गायकवाड यांनी सांगितले. प्रदूषण थांबवा, मोकळा श्वास घेऊ द्या अशा घोषणांचे फलक घेऊन नागरिक सहभागी झाले होते. प्रकाश डावरे, मिलिंद गान, जावीर, संभाजी कळमकर, नीता परदेशी, दीपक पवार आदी पदाधिकारी उपस्थित होते.