डोंबिवली : येथील एका तरूणाची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून गुंतवणुकीवर मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवून १७ लाखाहून जास्त रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत रामनगर पोलीस ठाण्यात फसवणूक झालेल्या आल्हाद रानडे या तरूणाने तक्रार केली आहे. पोलिसांनी माहिती आणि तंत्रज्ञान कायद्याने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. संगणक तंत्रज्ञ असलेला हा तरूण रामनगरमधील राजाजी रस्ता भागात राहतो.
पोलिसांनी सांगितले, तक्रारदार आल्हाद रानडे यांना गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये त्यांच्या मोबाईलच्या व्हॉट्सॲपवर एक लघुसंदेश आला. आपणास अर्धवेळ नोकरी करायची असेल तर आपण संपर्क करू शकता अशी विचारणा त्यात होती. आल्हाद यांनी त्या लघुसंदेशाला प्रत्युत्तर देऊन कामाबाबत विचारणा केली. त्यावेळी समोरून रितू नावाच्या महिलेने आम्ही तुम्हाला दिलेल्या ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करा. तुम्हाला तत्काळ २१० रूपये मिळतील. त्या प्रक्रिया पूर्ण केल्यावर आल्हाद यांना इन्स्टाग्रामच्या माध्यमातून काही जुळण्या आल्या. त्या आल्हाद यांनी भरून दिल्या. त्यात आल्हाद यांच्या बँक खात्यांची माहिती भरून घेण्यात आली. इनस्टाग्रामच्या १४७ सदस्य असलेल्या गटात आल्हाद यांना सामावून घेण्यात आले. ग्रुप प्रमुख कपील सिंग, एमेली सिंग यांनी आता तुम्ही जेवढी रक्कम गुंतवाल त्या रकमेचे गुगल मॅप, पंचतारांकित हॉटेल गुणांक द्याल तेवढ्या बदल्यात तुम्हाला २० ते ४० टक्के केलेल्या गुंतवणुकीवर आकर्षक परतावा तात्काळ मिळेल, असे आश्वासन भामट्यांनी दिले.
इतर सदस्य आल्हाद यांना ग्रुपमधून गुंतवणुकीतून आकर्षक परतावा तात्काळ मिळत असल्याचे दाखवून देत होते. आल्हाद यांना त्याचा अनुभव येत होता. कमी कालावधीत वाढीव परतावा मिळत असल्याने आल्हाद यांनी एचडीएफसी, ॲक्सिस, आयसीआयसीआय, फेडरल, पंजाब नॅशनल अशा बँक खात्यामधून २० हजार ते ४० हजार रूपये टप्प्याटप्प्याने मागील महिनाभराच्या कालावधीत भामट्यांच्या सूचनेप्रमाणे गुंतवले. एकूण १७ लाख ३३ हजार रूपये भरणा केल्यानंतर आरोपी कपील, ऐमिली हे आल्हाद यांना संरक्षित रक्कम, रक्कम परतावा, कर तपासणी नावाखाली पैसे भरण्यास सांगत होते. एवढी रक्कम आपणाकडे नाही असे आल्हाद यांनी कळविताच आरोपींनी त्यांच्या बँक खात्यामधील रक्कम आल्हाद यांच्या खात्यात पाठविल्या. त्या रकमांचा तक्रारदाराने वापर करून आरोपीनी दिलेल्या प्रक्रिया पूर्ण केल्या. आता आपली रक्कम परत मिळाली पाहिजे या प्रयत्नात आल्हाद होते. रक्कम परत हवी असेल तर आणखी रकमा भरणा करा, असा आग्रह कपील, एमिली यांनी धरला. ही रक्कम भरणा केली नाही तर तुमची रक्कम परत मिळणार नाही असे सांगून आल्हाद रानडे यांना भामट्यांनी प्रतिसाद देणे बंद केले. त्यांना व्हॉट्सॲप गटातून बाहेर काढले. आपली आर्थिक फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर आल्हाद यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.