पर्यावरण परिषदेचे केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उदघाटन
कल्याण : रोटरी क्लबच्या सहकार्याने ठाणे जिल्ह्यातील 121 गावे आदर्श करणार असल्याची माहिती केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी दिली. कल्याणमध्ये रोटरी क्लबच्या वतीने ग्रामीण शेती, जमिनीचे संवर्धन, पर्यावरण या विषयावर परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेच्या उद्घाटनाप्रसंगी कपिल पाटील बोलत होते. यावेळी रोटरीचे प्रांतपाल कैलाश जेठानी, परिषदेचे अध्यक्ष तथा ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ, प्रकल्प प्रमुख मनीषा कोंडसकर, संयोजक कैलाश देशपांडे, समन्वयक जितेंद्र नेमाडे, जगदीश म्हात्रे, डॉ. शुश्रुत वैद्य, बिजू उंनिथन, निखिल बुधकर, नितीन मचकर आदीजण उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या आदिवासी मंत्रालयाच्या माध्यमातून प्रधानमंत्री आदर्श ग्राम योजना जाहीर झाली असून यासंदर्भात बैठका घेऊन या योजनांचा डीपीआर बनवून केंद्र सरकारकडे पाठविला आहे. केंद्र सरकार, राज्य सरकारच्या विविध खात्यांमार्फत काम करून ठाणे जिल्ह्यातील 121 गावे दोन टप्प्यात आदर्श करायची आहेत. मात्र रोटरीसारख्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मदत झाल्यास एकाच टप्प्यात ही गावे आदर्श करू शकतो. रोटरीने ही 121 गावे दत्तक घेण्यास सहमती दर्शवली असून त्यामुळे फार मोठे काम केंद्र सरकार आणि रोटरी क्लबच्या माध्यमातून या जिल्ह्यात उभे करता येईल, असा विश्वास कपिल पाटील यांनी व्यक्त केला.
ठाणे जिल्ह्यात एकीकडे टोकाचा विकास झालेली शहरे आहेत तर दुसरीकडे टोकाचा अविकसित भाग आहे. दोन्ही मधले अंतर कमी झाल्यास खऱ्या अर्थाने ठाणे जिल्ह्याचा विकास झाला असे बोलता येईल. त्यासाठी हा प्रयत्न असून येणाऱ्या काळात हे अंतर कमी करून संपूर्ण ठाणे जिल्हा विकासाच्या दृष्टीने अग्रेसर आहे असे बोलता येईल, असे मत यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केले. आगामी काळात रोटरीसोबत करार करून काम करण्याचा प्रयत्न असेल. जागतिक स्तरावर भारत कसा असावा या हेतूने काम करायला हवे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत कचऱ्याचे व्यवस्थापन यामध्ये देखील काम करून जिल्हातील 452 ग्रामपंचायतींमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यास देशात ठाणे जिल्ह्याचे नाव होईल. कार्बन न्यूट्रलची देशाला नाही तर जगाला गरज असून काश्मीरमध्ये हे कार्बन न्यूट्रल गाव आहे. त्याची दखल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. त्याच धर्तीवर ठाणे जिल्हातील 15 गावे कार्बन न्यूट्रल करणार असून यासाठी प्रत्येकी एक कोटी याप्रमाणे 15 कोटींचा निधी यासाठी देणार असल्याचे कपिल पाटील यांनी सांगितले.
यावेळी या परिषदेचे अध्यक्ष मिलिंद बल्लाळ यांनी रोटरीच्या कामाची माहिती दिली. रोटरी ही 117 वर्षे जुनी संस्था असून जगभरात 12 लाख रोटेरियन काम करतात. तर ठाणे जिल्ह्यात 109 क्लब असून यामध्ये चार हजार सदस्य आहेत. आज देखील 15 क्लबने एकत्र येत हा कार्यक्रम राबविला असून ग्रामीण भागात अनेक उपक्रम रोटरीने केले आहेत. ठाणे जिल्ह्यात सुमारे 450 चेक डॅम बांधले आहेत. यामुळे या भागातील भूजल पातळी वाढल्याने गावकऱ्यांचे स्थलांतर थांबले आहे. तर मुलींचे शिक्षण सुरू रहावे यासाठी एक हजारहुन अधिक टॉयलेट बांधले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार रोटरीच्या माध्यमातून काम करून ग्रामीण भागाचा विकास करणार असल्याचे बल्लाळ यांनी सांगितले.
या परिषदेत मृदा संवर्धन, पशु संवर्धन आणि कचऱ्याचे व्यवस्थापन आदी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात शहरासह ग्रामीण भागातही कचऱ्याची समस्या वाढत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात कचऱ्याचे व्यवस्थापन करत त्याचा खातात रूपांतर कसे करता येईल याबाबत ड्राय वेस्ट या विषयावर निसर्ग फाऊंडेशनचे डॉ. केळशिकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.