ठाणे : उपवन औद्योगिक परिसरात सुमारे १२०० लघु उद्योग असून अपुऱ्या आणि अनियमित वीज पुरवठ्यामुळे उद्योग अडचणीत आले होते. या उद्योगांना आता एक्स्प्रेस फिडर उपलब्ध करून देण्यात आला असून उद्योगांना दिलासा मिळाला आहे.
येथील ‘पोखरण लेक स्मॉल इंडस्ट्री असोसिएशन’च्या उपवन औद्योगिक वसाहतीमध्ये ‘एक्स्प्रेस फीडर लोकार्पण सोहळा उद्घाटन उद्या, गुरुवारी सकाळी ११ वाजता उपवन येथील सीजन बँक्विट हॉलशेजारी होणार आहे. येथील औद्योगिक वसाहतीतील विद्युत पुरवठा सुरळीत राहण्यासाठी हा एक्स्प्रेस फिडर बसवण्यात आला आहे.
यावेळी आमदार संजय केळकर आणि आमदार प्रताप सरनाईक हे उद्घाटक वलनी प्रमुख अतिथी आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आणि कोकण विभागाच्या उद्योग सह-संचालक विजू शिरसाठ, जिल्हा उद्योग केंद्रच्या महाव्यवस्थापिका सीमा पवार, अधिक्षक अभियंता युवराज मेश्राम, कार्यकारी अभियंता सतीश जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रशांत तोडकर आणि शिवाई नगरचे सहाय्यक अभियंता धनाजी पुकळे व असोसिएशनचे सर्व सभासद उपस्थित राहणार आहेत.
‘असोसिएशन’ च्या सन 2015 पासून होत असलेल्या सतत पाठपुराव्यामुळे उपवन येथील औद्योगिक वसाहतींमधील सुमारे 1200 लहान उद्योगांना त्यांच्या अडीअडचणी लक्षात ठेवून ‘एमएसईबी’कडून एक्सप्रेस फीडर लावण्यात आले आहेत. जेणेकरून उद्योजकांना अखंडित विद्युत पुरवठा होणार आहे.
हा एक्स्प्रेस फिडर लावण्यासाठी एमएसईबीच्या शिवाईनगर उपवन क्षेत्राचे सहाय्यक अभियंता धनाजी पुकले यांनी असोसिएशनला सहकार्य केले. त्यासाठी ठाणे जिल्हा उद्योग केंद्राचे अमूल्य सहकार्य मिळाले आहे. 11 केव्हीचे पाच ट्रान्सफॉर्मर सुमारे तीन कोटी 61 लाख 50 हजार रुपयांच्या किमतींचे आहेत. ह्या ट्रांसफॉर्मरमुळे सतत अबाधित विद्युत पुरवठा सुरु होणार असल्यामुळे स्थानिकांसह व उद्योजकांना उत्पादन वाढविण्यासाठी चालना मिळेल, अशी माहिती असोशिएशन’चे उपाध्यक्ष हरीश तिवारी यांनी दिली.