ठाणे: येथील सिव्हील रुग्णालयातील ‘डायलिसिस सेंटर’ मध्ये गेल्या सहा महिन्यांमध्ये रुग्णांचे एक हजार सेशन्स झाले आहेत आणि आता दोन सत्रांमध्ये सुरू झालेल्या या सेंटरमध्ये जास्तीतजास्त रुग्णांनी फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
डायलिसिस खर्च परवडणारा नसतो. अशा रुग्णांसाठी ठाणे सिव्हील रुग्णालयात विशेष कक्ष तयार केला आहे. सुसज्ज असलेल्या ‘डायलिसिस सेंटर’मध्ये दररोज रुग्णांवर उपचार होत आहेत. गेल्या सहा महिन्यांत एक हजार ‘डायलिसिस सेशन’ झाले असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी दिली.
डायलिसिस सेंटरमध्ये एकूण १४ मशीन आहेत. त्यापैकी एका सत्रात नऊ रुग्ण उपचार घेऊ शकतात आणि रुग्णांची संख्या वाढली तर उर्वरित मशीन्स उपयोगात आणल्या जाणार आहेत. अद्ययावत ठेवलेले डायलिसिस सेंटर पुढील टप्प्यात दोन ते तीन सत्रात सुरू ठेवले जाणार आहेत, असेही सांगण्यात आले.