संपादकीय

साठावं वरीस.....!

साठावं वरीस.....!
साठावं वरीस.....! फोटो: ठाणे वैभव
सोळावं वरीस धोक्याचं... या अजरामर गाण्याच्या ओळीत साठावं वरीस धोक्याचं...असा बदल केला तर शिवसेना (ठाकरे) गटाच्या सद्यस्थितीचे समर्पक वर्णन होऊ शकेल. पक्षाच्या ६०व्या वर्धापनदिनी पक्षात फूट पडावी याहून दुसरा दैवदुर्विलास नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर नितांत प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील जनतेला पक्षाची दुरावस्था पाहून वाईट वाटले नसेल तरच नवल! शिवसेनेची सूत्रे ठाकरे कुटुंबियांच्या हातून श्री.एकनाथ शिंदे यांच्या हाती गेल्यामुळे पक्षाचे नाव, चिन्ह आणि आता ठाकरे ब्रॅण्ड सर्वच बाबी काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना ठाकरे-अनुयायी सैनिकांच्या मनात आली असणार. एखाद्या फिनिक्स पक्ष्याप्रमाणे हा पक्ष या अवस्थेतून भरारी घेईल काय, या प्रश्नाचे सावट वर्धापनदिनाच्या कार्यक्रमावर असणार आहे. ठाकरे यांचे कुठे चुकले, ते कुठे कमी पडले वगैरे प्रश्न त्यांचे टीकाकार आणि राजकीय निरीक्षक तर विचारतच आहेत, पण त्याहीपेक्षा हे प्रश्न त्यांचे हितचिंतकही विचारत आहेत. त्यामागे मराठी माणसाच्या अस्मितेची प्रामाणिक काळजी आहे आणि त्याची सातत्याने होणारी उपेक्षा ही फिर्यादही आहे. या प्रश्नांची उत्तरे उद्धव ठाकरे वर्धापनदिनाच्या भाषणात देतील ही अपेक्षा आहे. शिंदे यांच्यावर टीका करुन शिळ्या कढीला ऊत आणण्यापेक्षा आगामी काळात सेना कोणती व्यूहरचना करील, कोणत्या कार्यक्रमांना प्राधान्य देईल, राजकारणापेक्षा समाजकारणालाच कसे महत्त्व देईल आणि मराठी माणसाच्या मनात पुन्हा कसा जिव्हाळा आणि आत्मीयता निर्माण करील याबाबत मार्गदर्शन होईल ही अपेक्षा आहे. राजकारण-समाजकारणाचे 20:80 हे प्रमाण उलट होत गेले, तिथेच सेनेचा ऱ्हास सुरु झाला. मान्य की राजकारण आणि ते करता-करता हाती येणाऱ्या सत्तेमुळे रयतेला अधिक न्याय देणे शक्य होते, परंतु प्रत्यक्षात तसे झाले का याचे आत्मपरीक्षण आजच्या वर्धापनदिनी ठाकरे यांच्या नेत्यांना करावे लागेल. मराठी माणूस अपेक्षाभंग झाल्याच्या मन:स्थितीत आहे, हे कटू सत्य सर्व सेना नेत्यांनी मान्य केले तर त्यांना धुसर झालेले भगवे किरण सापडेलही. गेल्या काही वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात एक वेगळाच पायंडा पडलेला दिसत आहे. राजकारण म्हणजे सत्ताकारण आणि ते मिळवण्यासाठी नीतीमत्ता वाऱ्यावर सोडून देण्याची सवय, पक्ष, पक्षाची शिस्त, ध्येयधोरणे, जनसंवाद, अभ्यासूवृत्ती, सामाजिक हीत आदी गुण असणारे नेते लोप पावू लागले आहेत. पुरेशी उमेदवारी न करता महत्वाकांक्षा बाळगणारे आणि अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले कार्यकर्ते ना ज्येष्ठतेच्या निकषात बसतात की लोकाभिमुख नेतृत्वाच्या निकर्षात अपेक्षेला उतरतात. त्यांचे इलेक्टीव्ह मेरीट हे पैसा किंवा जात या दोन निकषांवर प्रामुख्याने आधारित असल्यामुळे घोळ झाला आहे. सेनेचे मतदार, प्रामुख्याने मध्यमवर्गीय यांना हे ‌‘मेरीट‌‘ (?) मेरीटच वाटत नसते. त्याबद्दल फेरविचार करण्याची प्रक्रिया उद्याच्या वर्धापनदिनी सुरु करणे एक नवी वाट चोखाळण्यासारखे होईल. आजचे राजकारण बटबटीत आणि शिसारी आणणारे झाले आहे आणि ते मराठी माणसाच्या मूळ पिंडाशी जुळणारे नाही. मराठी माणूस पुरोगामी, सहिष्णू, सुसंस्कृत आणि सचोटीने वागणारा म्हणून ओळखला जातो. आजच्या राजकारणाने हे सर्व गुण पुसण्याचा जणु ठेका घेतला आहे असे दिसते. उद्धव ठाकरे यांना हा विचार पेरण्यासाठी पक्षांतर्गत फेरबदल करावे लागतील, विचारधारेत बदल करावे लागतील आणि जनमानसात विश्वास निर्माण करावा लागेल. आजपर्यंत जे झाले ते चुकीचे होते, अशी प्रांजळ कबुली द्यावी लागेल. मराठी माणूस मोठ्या मनाने ती स्वीकारतीलही, परंतु त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांना घाम गाळावा लागेल. श्री. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करण्यापेक्षा त्यांचा हा गुण सेनेच्या युवा कार्यकर्त्यांनी घ्यायला हवा. श्री. शिंदे यांचे दौरे, जनमानसात मिसळणे आणि संवाद साधणे या गुणांमुळे त्यांची घोडदौड सुरु आहे. त्याचे अनुकरण झाले आणि सकारात्मकतेवर भर दिला तर ६०वे वरीस धोक्याचे होण्याऐवजी नव्या आशेचे होऊ शकेल.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475