संपादकीय

एक हत्या, प्रश्न अनेक!

एक हत्या, प्रश्न अनेक!
एक हत्या, प्रश्न अनेक! फोटो: ठाणे वैभव

नीतिमत्ता संपलेल्या आणि कायम अनिश्चिततेच्या फेऱ्यात अडकलेल्या राजकारणात स्पर्धा जीवघेणी झाली नाही तरच नवल. त्यातून ठाण्यातील मानपाडा येथे ठाकरे शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांची हत्या झाल्यामुळे राजकारण अत्यंत धोकादायक झाले आहे असेच म्हणावे लागेल. हल्लेखोरांनी दुचाकीवरून येऊन पूर्णेकर यांच्यावर गोळ्या झाडल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेबाबत मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपीपर्यंत त्यांना पोहोचता येणे शक्य होईल अशी आशा आहे.

राजकारणातून निर्माण होणारा सत्तासंघर्ष निवडणुका आटोपल्या तरी कार्यकर्त्यांमध्ये खदखदत राहतो. पूर्णेकर यांची पत्नी आणि बंधू यांनी महापालिकेची निवडणूक उबाठातर्फे लढवली होती. त्यात ते विजयी झाले नव्हते. पोलीस या जीवघेण्या हल्ल्यामागे वैमनस्याचा मुद्दा नाकारणार नाहीत. राज्य शासनाच्या गृह खात्यावर याप्रकरणी छडा लावण्यासाठी दबाव असणार आहे आणि हल्लेखोरांना अटक होण्यात दिरंगाई झाली तर विरोधी पक्ष त्यांच्यावर हात धुऊन मागे लागणे स्वाभाविक आहे. ठाण्याला गेल्या काही वर्षांत आलेले राजकीय महत्त्व लक्षात घेता ही घटना चर्चेत राहणार. सार्वजनिक स्मरणशक्ती अशावेळी अपवादात्मकपणे दीर्घकाळ जागृत राहणार. ठाकरे गटाचे नेते ज्याप्रकारे पोलीस स्थानकात ठिय्या मारून बसले होते, ते लक्षात घेता त्यांचा निर्धार स्पष्ट दिसतो. 

राजकारणातील अर्थकारण, विशेषत: बांधकाम व्यवसायातील गुंतवणूक, विविध नागरी कामांतील ठेकेदारी आणि अशाच स्वरुपाचे हितसंबंध यामुळे झटपट श्रीमंत होण्याच्या इर्षेने राजकारणी पछाडलेले दिसतात. पैशाचे अनन्यसाधारण महत्त्व आणि ते मिळवण्यासाठी लागणारी महत्वाकांक्षा प्रसंगी राक्षसी कशी ठरू शकते त्याचे हे ताजे उदाहरण. शक्ती-प्रदर्शन करताना वैचारिक भूमिका, जनसंवाद, सकारात्मक कार्यक्रम, सांस्कृतिक उपक्रम याकडे फारसे लक्ष दिले जात नाही. कमी पैशांत नेतृत्व सिद्ध करण्यावरचा जणू विश्वासच उडाला आहे आणि उपद्रवमूल्याला तरणोपाय नाही. त्यातून हिंसाचार होत असेल तर त्याचाही तपास व्हायला पाहिजे. अर्थात अशा घटनांची पुनर्रावृत्ती होऊ नये म्हणून सर्वच राजकारण्यांनी आपापल्या भूमिकेत आणि वर्तनात बदल करायला हवा. पूर्णेकर यांच्या हत्येकडे एक गंभीर आव्हान म्हणून पाहायला हवे. विशेषत: त्यामागे राजकीय वैर असेल तर ही बाब भलतीच गंभीर बनते. पूर्णेकरांच्या मृत्यूने असंख्य प्रश्न निर्माण केले आहेत.

संबंधित बातम्या

Advertisement ADVERTISEMENT 300x475

नागरिक अपडेट्स

  • water_drop
    पाणीपुरवठा
    Surplus
  • directions_car
    वाहतूक कोंडी
    High
  • bolt
    वीज पुरवठा
    Normal
  • train
    मेट्रो काम
    Active
Advertisement ADVERTISEMENT 300x475