भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांची श्वेतपत्रिकेची मागणी
ठाणे : ठाणे महापालिकेने नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता अनेक श्रीमंत संस्थांना देण्यात आल्या आहेत. १०० कोटींचा ठाणे क्लब, हॉस्पिटलसाठी इमारती, शहरातील ७५ हजार चौरस फुटांच्या जाहिरातीचे केवळ सुशोभिकरणाच्या बदल्यात हक्क दिले गेले. अशा सर्व मालमत्ता महापालिकेने ताब्यात घेऊन रेडीरेकनर दराने द्याव्यात. तसेच महापालिकेच्या स्थावर मालमत्तेची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी आज महासभेत केली.
राज्य सरकारकडून महापालिकांना मालमत्ता मुद्रीकरणाच्या माध्यमातून उत्पन्नवाढीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आजच्या महासभेत प्रशासनाकडून सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी नगरसेवक नारायण पवार यांनी महापालिकेच्या उत्पन्न वाढीसाठी नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्याची आवश्यकता व्यक्त केली. महापालिकेच्या भाड्याने व नाममात्र दराने दिलेल्या मालमत्ता ताब्यात घेतल्यास, ठाणे ही सर्वात श्रीमंत महापालिका होईल, असे भाकीत नारायण पवार यांनी केले.
तीन हात नाका येथे सर्वसामान्य नागरिकांसाठी तरण तलाव व हॉल असलेली वास्तू १०० कोटी रुपये खर्चून उभारली गेली. मात्र, ही वास्तू नाममात्र भाड्याने दिली गेली. या ठिकाणी आता ठाणे क्लबच्या नावाने व्यवस्थापनाकडून एका वर्षासाठी एका कुटुंबाकडून पाच लाख रुपये शुल्क आकारणी होत आहे. लग्न व साखरपुडा आणि इतर कार्यक्रमांसाठी लाखो रुपये वसूल केले जात आहेत.
महापालिकेने काही हॉस्पिटलसाठी भूखंड व इमारती अल्पदराने दिल्या. या ठिकाणी ठाणेकरांना मोफत व अल्पदरात उपचाराची सुविधा मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, ठाणेकरांना सवलतीऐवजी हॉस्पिटलकडून लाखो रुपयांची बिले आकारली जातात. गरजू व गरीब रुग्णांना सेवा पुरविली जात नाही.
शहरात जाहिरातीचे बोर्ड लावण्यासाठी हजारो रुपयांचे दर आकारले जातात. परंतु, ठाणे महापालिकेने केवळ सुशोभिकरणाच्या नावाखाली ७५ हजार चौरस फूट जागा मोफत दिली. त्याऐवजी राष्ट्रीय स्तरावरील जाहिरात कंपन्यांकडून निविदा मागवाव्यात. त्यातून को्टयवधी रुपये उत्पन्न मिळू शकेल.
महापालिकेच्या अनेक मालमत्ता व मैदाने नाममात्र दराने दिल्या गेल्या आहेत. त्याचा सामान्य ठाणेकर नागरिकांना काहीही फायदा होत नाही. त्यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्यासाठी महापालिकेच्या मालमत्ता ताब्यात घ्याव्यात. त्यानंतर त्यांचा रेडीरेकनर दराने जाहीर लिलाव पुकारावा, अशी सूचना नगरसेवक नारायण पवार यांनी केली.