नवी मुंबई : नवी मुंबईमधील पावणे एमआयडीसीमधील डब्लू ६, महेक केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या आगीत दुपारपर्यंत कोणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची माहिती पावणे अग्निशमन दलाकडून देण्यात आली.
महेक कंपनीमध्ये रसायन बनवण्याचे काम होत असून गुरुवारी सकाळी ही आग लागली. आगीची घटना समजताच एमआयडीसी आणि नवी मुंबई महानगरपालिका अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. कंपनी रसायनाची असल्याने आगीने थोड्याच वेळात भीषण रूप धारण केले होते.
शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत सुमारे साडेतीन तासाच्या अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाकडून ही आग आटोक्यात आणली. या आगीत कुणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची प्राथमिक माहिती पावणे एमआयडीसी अग्निशमन दलातील अधिकारी एस.एल.पाटील यांनी दिली असून खरे चित्र संपूर्ण आग विझल्यानंतर तपासणीअंती स्पष्ट होणार आहे.
पावणे एमआयडीसीत रसायन कंपनीला गुरूवारी सकाळी आग लागली असताना पावणे भागात आणखी एका कंपनीत किरकोळ आग लागल्याची घटना घडली. सी ३२७, नट व्याली प्रा.लिमिटेड या बदाम सोलणाऱ्या कंपनीत सुमारे आठ ते साडे आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. मात्र अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आग विझवली.या आगीत कोणीही जखमी किंवा मृत झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.