नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर हा प्रमुख स्त्रोत असून यामधूनच महापालिकेस विविध सोयी-सुविधा पुरवण्यासाठी निधी उपलब्ध होत असल्याने आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले आणि मालमत्ता कर विभागाच्या अधिकारी कर्मचारी समूहाने मालमत्ता कर वसुलीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे.
त्यादृष्टीने नियोजनबद्ध पावले टाकीत विविध उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यावर विशेष लक्ष दिल्यानेच यावर्षी 1 एप्रिल 2023 ते 31 डिसेंबर 2023 या नऊ महिन्यांच्या कालावधीत 465.70 कोटी मालमत्ता करवसूली करण्यात विभागाने यश मिळवलेले आहे. मागील वर्षी 31 डिसेंबरपर्यंत 398.65 कोटी इतकी करवसुली झाली असून यावर्षी त्यापेक्षा अधिक 67.05 कोटी रकमेची कर वसुली झाल्याने महानगरपालिकेच्या सेवा सुविधांकरिता अधिकचा निधी उपलब्ध झालेला आहे. त्या अनुषंगाने सन 2023-24 करता अर्थसंकल्पात दिलेला 800 कोटींचा लक्ष्यांक साध्य करणे या उद्दिष्टपूर्तीकडे यशस्वीरित्या सकारात्मक वाटचाल सुरू आहे.
या उद्दिष्टाकडे वाटचाल करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी मालमत्ताकर विभागातील अधिकारी – कर्मचारीवृंदाच्या वारंवार बैठका घेत थकबाकीदारांच्या रकमेची उतरत्या क्रमाने यादी तयार करून प्रत्येक विभाग कार्यालयास लक्ष्य ठरवून दिले व सातत्याने आढावा घेत याबाबतच्या कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवले.
त्यासोबतच अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या थकबाकीदारांच्या वसूलीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले तसेच मागील वर्षात करनिर्धारण झालेल्या मात्र मालमत्ताकर भरणा बाकी असलेल्या थकबाकीदारांच्या करवसूलीकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले.
नवीन करनिर्धारण करण्यात आलेल्या मालमत्ता तसेच पहिल्या टप्प्यात औद्योगिक एमआयडीसी क्षेत्रात झालेल्या लीडार सर्वेक्षणाचा उपयोग काही प्रमाणात होऊन मालमत्ता कर वसूलीला गती लाभली. याचीच परिणिती म्हणून मागील वर्षीच्या तुलनेत डिसेंबर अखेरपर्यंत 67 कोटी पाच लाख रुपयांची अधिक मालमत्ताकर वसूली झालेली दिसून येत आहे.
* बेलापूर विभाग : 46 कोटी 43 लाख 48 हजार 415,
* नेरूळ विभाग : 90 कोटी 01 लाख 67 हजार 435,
* वाशी विभाग : 35 कोटी 72 लाख 70 हजार 800,
* तुर्भे विभाग : 78 कोटी 39 लाख 80 हजार 556,
* कोपरखैरणे विभाग : 80 कोटी 70 लाख 23 हजार 835,
* घणसोली विभाग : 49 कोटी 81 लाख 82 हजार 90,
* ऐरोली विभाग : 57 कोटी 71 लाख 73 हजार 975,
* दिघा विभाग : 14 कोटी 56 लाख 35 हजार 806,
* मुख्यालय : 12 कोटी 32 लाख 18 हजार 219