दादोजी कोंडदेवमधील उपहारगृहाचे भाडे होणार माफ

ठाणे : कोरोनामुळे मागील दोन वर्षे बहुतेकांना फटका बसल्याचे दिसून आले. पालिकेच्या आर्थिक स्थितीवर देखील परिणाम झाल्याचे दिसून आले. दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील उपहारगृह देखील या कालावधीत बंद होते. त्यामुळे उपहारगृह चालकाने या काळातील सात महिन्यांचे भाडे माफ करण्याची विनंती पालिकेकडे केली होती. त्यानुसार उपहारगृहाचे या कालावधीतील ६ लाख २० हजार २०५ रुपयांचे भाडे माफ होणार आहे. त्यानुसार उपहारगृहाचे या कालावधीतील सहा लाख २० हजार २०५ रुपयाचे भाडे माफ होणार आहे.

दादोजी कोंडदेव उपहारगृहाचे कोरोना काळातील भाडे माफ करण्यासाठी उपहारगृह चालकाने केलेल्या विनंतीचा विचार करून त्यानुसार आता भाडेमाफीचा प्रस्ताव येत्या 3 मार्च रोजी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. उपहारगृहाचे या कालावधीतील ६ लाख २० हजार २०५ रुपयांचे भाडे माफ करण्यात येणार असून त्याच्याकडून सप्टेंबर ते डिसेंबर २०२० व मार्च २०२१ तसेच जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील ४७ हजार २७३ रुपयांचे भाडे वसुल केले जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक आस्थापना या कालावधीत बंद होत्या. त्याचा फटका दादोजी कोंडदेव क्रीडागृहातील उपहारगृहाला देखील बसल्याचे दिसून आले. या कालावधीत येथील उपहारगृह देखील बंद होते. त्यानंतरही येथील उपहारगृह चालकाने एप्रिल ते ऑगस्ट २०२० या कालावधीतील तीन लाख ३७ हजार ६८६ रुपयांचे भाडे पालिकेला अदा केलेले आहे. ही रक्कम सप्टेंबर ते डिसेंबर २०२० व मार्च २०२१ या पाच महिन्यांच्या कालावधीत भाडे भरणा न केल्याने एप्रिल २०२० ते ऑगस्ट २०२० या कालवधीतील भाडे माफ करुन समायोजित करण्याची विनंती संबधीत संस्थेने पालिकेकडे केली आहे. त्यानुसार आता तीन लाख ३७ हजार ६८६ रुपयांची रक्कम ही समायोजित केली जाणार आहे. तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२१ या कालवधीत या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु होते. त्यामुळे या कालावधीतील सहा लाख २० हजार २०५ रुपयांचे भाडे माफ करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. तर सप्टेंबर ते डिसेंबर २०२०, मार्च २०२१ व जानेवारी व फेब्रुवारी २०२१ या कालावधीतील ४७ हजार २७३ रुपयांचे भाडे पालिका वसुल करणार आहे.