ठाणे: खा. सुप्रिया सुळे यांनी घरात बसून स्वयंपाक करावा; आरक्षण द्या नाहीतर मसणात जा, अशी टीका करणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसने ठाण्यात पुतळा जाळला.
बुधवारी राष्ट्रवादीच्या ओबीसी परिषदेमध्ये खा. सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्राची फसवणूक झाल्याचे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना, “खासदार आहात ना, समजत नसेल तर घरात बसा, स्वयंपाक करा. दिल्लीत जा मसणात जा; पण, आरक्षण द्या”, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याविरोधात गृहनिर्माण मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात घोषणा दिल्या.
सर्वात जास्त वेळा संसदरत्न बहुमानाने खा.सुप्रिया सुळे यांना सन्मानित करण्यात आले आहे. मात्र, ज्यांना स्वतःच्या गावातील उमेदवारी वाचवता येत नाही, संन्यास घेण्याची घोषणा करून पराभवानंतरही तोंड वर करून काहीही बरळत आहेत त्या चंद्रकांत पाटील यांना मनोविकारतज्ज्ञांकडे नेण्याची गरज आहे, अशी टीका आनंद परांजपे यांनी केली. चंद्रकांत पाटील यांच्या प्रतिमेला कुंकू, नथीचे चित्र काढून त्यास जोडे मारले आणि आंदोलकांनी चंद्रकांत पाटील यांचा पुतळाही जाळला. ठाण्याच्या प्रादेशिक मनोरुग्णालयात पाठवा. त्यांच्यासाठी आम्ही एक बेड आरक्षित करीत आहोत. तसेच ते ठाण्यात आल्यावर त्यांना साडीची भेट देऊ, अशी टीकाही परांजपे यांनी केली.
या आंदोलनात युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कैलास हावळे, सचिन पंधारे, राजू चापले, प्रभाकर सावंत, मिलिंद बनकर, शशिकला पुजारी, ज्योती निंबर्गी, फुलबानो पटेल आणि शेकडो पुरुष-महिला पदाधिकारी सहभागी झाले होते.