ठाणे: कै. श्री. नंदू नाटेकर स्मृती महाराष्ट्र राज्य आंतरजिल्हा स्पर्धा मुंबईच्या गोरेगांव स्पोर्ट्स क्लब येथे आयोजित केल्या होत्या. या स्पर्धेत एकूण 33 जिल्ह्यांचे संघ सामील झाले होते. ज्यात 20 पुरुषांचे तर 13 महिलांच्या जिल्हा संघांचा समावेश होता. या स्पर्धेत यश सूर्यवंशी याने प्रतिनिधित्व केलेला ठाणे जिल्हा पुरुष संघ या स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी ठरला आहे.
यश सूर्यवंशी, सर्वेश यादव, प्रतीक रानडे, दीप रांभिया, झेकों सेई, प्रथमेश कुलकर्णी, कबीर कंझारकर, वेदांत जवंजाळ सर्वेश यादव आणि अथर्व जोशी यांचा समावेश असलेल्या संघाने ही किमया साध्य केली आहे.
यश सूर्यवंशी याने दीर्घकाळ चाललेल्या एकेरीच्या सामन्यात 19-,21 13-21 9-21 असा विजय प्राप्त करीत ठाणेकर संघाचा अंतिम फेरीकडे जाण्याचा मार्ग मोकळा केला याच फेरीत प्रथमेश कुलकर्णी याने आर्यन एकटेला 21-9, 21-19 असे एक हाती हरवले. अंतिम फेरीत जुने प्रतिस्पर्धी आणि सुवर्णपदकाचे समान दावेदार म्हणजेच पुणे जिल्हा पुरुष संघ आणि ठाणेकर संघ हे एकमेकांस भिडले.
प्रथमेश कुलकर्णी याने उत्तम खेळाचे सादरीकरण करीत यश शहा या पुणेकर खेळाडूस 9-21,15-21 असे सरळ सेटमध्ये हरवून एक शून्य अशी बढत मिळवली. तर पुढच्याच सामन्यात राज्यात नावाजलेली जोडी दीप रंभिया आणि प्रतीक रानडे यांनी आर्यन शेट्टी व यश शहा यांना हरवले.
परंतु यापुढे पुणेकर खेळाडूंनी शर्तीचे प्रयत्न करीत पुढील दोन्ही सामन्यात विजय प्राप्त केला व दोन दोन अशी बरोबरी साधली.
ठाणे जिल्हा पुरुष संघाचा कर्णधार यश सूर्यवंशीने या परिस्थितीत अतिशय जबाबदारीने महत्त्वाची भूमिका बजावीत निर्णायक सामन्यात सुवीर प्रधान याला 19-21,17-21 असे हरवून ठाणे जिल्हा पुरुष संघाला सुवर्णपदक प्राप्त करून दिले.
या स्पर्धेत ठाणेकर महिलांचा संघ उपविजेता ठरला आहे. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून एकूण 13 जिल्ह्यांच्या महिला संघाने सहभाग घेतला होता. ठाणे संघात सिया सिंग, अक्षया वारंग, अनघा करंदीकर, आर्या कोरगावकर, अनामिका सिंग, सानवी मुकादम आणि गार्गी दिगवेकर यांचा समावेश होता.
उपांत्य फेरीत ठाण्याच्या महिला संघाने ग्रेटर मुंबई जिल्हा बॅडमिंटन संघाचा दोन शून्य असा पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली परंतु त्यांना अंतिम फेरी पुण्याच्या
महिला संघाकडून हार पत्करावी लागली.
ठाणेकर संघाच्या या घवघवीत यशासाठी ठाणे बॅडमिंटन अकॅडमीचे योजनाप्रमुख श्रीकांत वाड त्याचप्रमाणे ज्येष्ठ प्रशिक्षक मयूर घाटणेकर व अक्षय देवलकर यांच्या समवेत राजीव गणपुले, विघ्नेश देवळेकर, कबिर कंझारकर व संपूर्ण टीमवर ठाणे जिल्ह्यातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.