गटाराच्या नवीन कामात आढळले २२ वर्षे जुने झाकण

जुहुगावात स्थापत्य विभागाचा भ्रष्टाचार उघडकीस

नवी मुंबई: वाशी विभागातील जुहू गावात गाळाने भरलेले गटार साफ करण्यासाठी खोदकाम केले असता त्याठिकाणी २२ वर्ष जुने गटाराचे झाकण आढळून आले आहे. या झाकणास जुहू गावातील ग्रामस्थांनी भ्रष्टाचाराच्या खजिन्याची उपहासात्मक उपमा दिली आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेच्या वतीने शहरात स्थापत्य विभागामार्फत रस्ते, गटार, पदपथासह अनेक कामे केली जातात. यातील गटार, पदपथांची कामे करत असताना जुनी कामे संपूर्ण न तोडता जुन्याच कामांवर नवीन मुलामा लावून ठेकेदार ही कामे पूर्ण करतात. अशा कामांवर देखरेख करणारे अभियंते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याने शहरात अशी कामे फोफावली आहेत. अशाच एका कामाचा जुहु गावात पर्दाफाश झाला आहे. या ठिकाणी २१ नोव्हेंबर २०२३ रोजी, गाळाने भरलेल्या गटारातील दोन झाकणाच्या मध्यभागी गाळ काढण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांनी रस्ता खोदण्याचा प्रयत्न केला असता गटारांवर २२ वर्ष जुने गटारांचे झाकण आढळले. या गटाराचे मागील ८ ते ९ वर्ष अगोदर नवीन काम केले होते. तेव्हा जुने गटार साफ न करता त्यावरच नवीन गटार बनवले गेले असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

मनपातील कामात अशा प्रकारे भ्रष्टाचार होत असल्याने विभागातील गटार आणि डांबरी रस्त्याच्या कामांचे त्रयस्थ संस्थेकडून ऑडिट करून घ्यावे व यातील दोषी ठेकेदार आणि अभियंत्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जुहुगाव ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी केली आहे.