खारीगाव रेल्वे पुलावरील प्रवास ज्येष्ठांसाठी ठरली कसरत

ठाणे : रेल्वे रूळ ओलांडताना प्रवाशांचा जीव जाण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत होत्या. त्यावर उपाय म्हणून खारीगाव येथे एफओबी उभारण्यात आला, मात्र हा पूल वृद्ध, गरोदर महिला, विद्यार्थी यांना त्रासदायक आणि वेळखाऊ ठरत आहे.

खारीगाव रेल्वे फाटक ओलांडताना रेल्वेची धडक बसून अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले होते. अपघात टाळण्यासाठी महापालिकेने रेल्वे उड्डाणपुलाची उभारणी केली. या कामावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची लढाईही रंगली होती. या पुलामुळे वाहनांचा विनाअडथळा वेगवान प्रवास सुरु झाला आहे. या पुलावर नागरिकांना ये-जा करण्यासाठी जिन्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु या जिन्यांच्या विचित्र रचनेमुळे पादचाऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे. या जिन्याची व्यवस्था ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला, विद्यार्थी, आजारी व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती, अंत्ययात्रा या सर्वांसाठी अजिबात उपयोगाची आणि सोईची नाही. या गैरव्यवस्थेमुळे दमछाक होत असल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत, असे आनंद विहार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष दवणे यांनी सांगितले.

पूर्वी रेल्वे फाटक ओलांडण्यासाठी ३० सेकंदाचा अवधी लागत होता. आता नवीन जिन्यावरील प्रवासासाठी ८ ते १० मिनिटांचा जास्तीचा वेळ लागत आहे. यामुळे खारीगांव आणि कळव्याचे अंतर २० मिनिटांनी वाढले आहे. या पुलाची उंची ४ माळ्याच्या इमारती इतकी असल्यामुळे, हातात सामानाचे ओझे घेऊन पुलावरून चढउतार करताना पादचाऱ्यांची दमछाक होत आहे. तसेच पादचारी पुलाची ज्या ठिकाणी उभारणी करण्यात आली आहे, ते ठिकाण निर्जन, असुरक्षित आहे. याठिकाणी रात्री ९ वाजेनंतर रहदारी कमी होते. या वेळेत प्रवास करणे स्त्रियांना आणि आबाल वृध्दांना धोकादायक आहे. त्यामुळे पादचारी पुलाची व्यवस्था जनतेच्या दृष्टीने गैरसोईची आहे. ही गैरसोय टाळण्यासाठी पादचाऱ्यांकरिता भुयारी मार्ग उभारणे गरजेचे असून त्यासाठी महापालिकेकडे पत्राद्वारे मागणी केली होती. त्याचे पुढे काहीच झालेले नसून पालिकेला पुन्हा पत्र देण्यात येणार आहे. तसेच या मागणीसाठी परिसरात स्वाक्षरी मोहिम राबविण्यात येत आहे, असेही आनंदविहार ज्येष्ठ नागरिक संघाचे सुभाष दवणे यांनी सांगितले.