ठाणे: दक्षिण आफ्रिकेच्या ओमीक्रोन विषाणूच्या भीतीने साऱ्यांना ग्रासले असतानाच ठाण्यात आज कोरोनाचे अवघे २१ रुग्ण आढळून आले आहेत. ठाणेकरांना दिलासा मिळाला असला तरी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ठाण्यात काल दोन हजार ३७७ नागरिकांच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. त्यात २१ नागरिकांच्या चाचण्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. गेल्या काही दिवसांतील हा सर्वात कमी आकडा आहे. सुदैवाने आज एकही रुग्ण दगावला नसून ३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या फक्त ३०८ एवढी आहे.
आज आढळून आलेल्या २१ रुग्णांमध्ये माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील नऊ रुग्णांचा समावेश आहे. वर्तकनगर प्रभागात पाच रुग्ण आढळून आले आहेत. वागळे प्रभागात तीन तर नौपाडा-कोपरी, उथळसर, मुंब्रा आणि दिवा भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. लोकमान्य-सावरकरनगर आणि कळवा प्रभाग हद्दीत शून्य रुग्ण आढळले आहेत.