सहा वर्षाच्या ग्रीहिता विचारेची नवरा-नवरी सुळक्यांवरून झिप्लायनिंग

कल्याण : इतिहासात पहिल्यांदाच नवरा-नवरी या दोन सुळक्यांवरून झिप्लायनिंग करत कल्याणच्या सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर या साहसी गिर्यारोहण संस्थेने यशस्वी कामगिरी केली आहे. या मोहिमेत सहा वर्षीय ग्रीहिता विचारे हिने देखील झिप्लायनिंग केली आहे.

सह्याद्रीच्या पर्वत रांगेत असंख्य आणि उंचचं उंच सुळके आहेत. त्यातील प्रमुख आकर्षण असते ते “नवरा-नवरी” सुळक्यांचे. नवरा-नवरी सुळके म्हणजे एकाच डोंगरावर आजूबाजूला उभे असलेले सुळके. असेच नवरा नवरी सुळके त्रिम्बकेश्वर गावातील पहिने हद्दीतील लक्ष्मणपाडा या छोट्या वाडीच्या बाजूला पाहायला मिळतात. नवरी सुळक्याची उंची सुमारे २८० फूट उंच असून नवरा सुळक्याची उंची ही सुमारे २६० फूट आहे. सोबतच ह्या नवरा-नवरी सुळक्याच्या आजूबाजूला श्री हनुमान ह्यांच जन्मस्थान असलेले अंजनेरी पर्वत, भांडरदुर्ग, भास्करगड, हरिहर असे उंच पर्वत पाहायला मिळतात.

वय वर्षं केवळ सहा असलेल्या कल्याणच्या ग्रीहिता विचारे या  चिमुकल्या मुलीचे महाराष्ट्र राज्याची पारंपरिक वेशभूषा अर्थातच नववारी साडी नेसून सुमारे दोन हजार फूट उंचीवरून दोन सुळक्यांवरून झिप्लायनिंगद्वारे यशस्वीरित्या मोहीम फत्ते केली आहे. सकाळी ६ वाजता लक्ष्मणपाडा येथून सुळक्याच्या माथ्यावर चढायला सुरुवात केल्यानंतर सुमारे एक तासाचा ट्रेक केल्यानंतर नवरा-नवरी सुळक्यांचा पाया गाठला गेला. “सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर” या गिर्यारोहण क्षेत्रातील नावाजलेल्या संघाने ग्रीहिता हिला प्रस्तरारोहण चे साहित्य योग्य रितीने लावून तिला चढाईसाठी तयार केले. त्यात कंबरेला बांधलेले हर्णेस, डोक्यावर हेल्मेट, झूमर असे विविध साहित्य तपासले. अथक प्रयत्न केल्यानंतर नवरी सुळक्यावर ग्रीहिता पोहचली, जिथे सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्यांनी एक दिवस आधीच झिप्लायनिंगचा सेटअप लावला होता. ग्रीहिताने झिप्लायनिंगद्वारे यशस्वी चढाई करून सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाच्या मदतीने कल्याण शहराच्या मुकुटात मानाचा तुरा खोवला आहे.

सहयाद्री रॉक ऍडव्हेंचरच्या पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, कल्पेश बनोटे, राजेश गायकर, अक्षय जमदरे, प्रदीप घरत, सुनील खणसे, रसिका येवले, विकी बुरकुले, महेंद्र भांडे, भावेश संकपाळ, ऋषीकेश बापर्डेकर, विश्वनाथ सुर्वे आणि स्वप्नील भोईर यांचे ग्रीहिता ला मोलाचे सहकार्य लाभले.

पहिने गावच्या नवरा-नवरी सुळक्यांच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन सुळक्यांमध्ये दोरीवर लटकून सुळके पार केले म्हणून पोलीस पाटील यांनी सह्याद्री रॉक ऍडव्हेंचरच्या उपस्थित असलेल्या दर्शन देशमुख, भूषण पवार, रसिका येवले, अक्षय जमदरे, प्रदीप घरत यांचा विशेष सत्कार केला.