ठाणेवैभव-अ. भा. मराठी बालरंगभूमी परिषदेचा उपक्रम
ठाणे : आकाशात उजळून टाकणारी दिवाळी पाहून आपण आनंद लुटत असतो. परंतु निरागस बालकांच्या डोळ्यात तेवणाऱ्या चमकदार पणत्या पाहून मन प्रसन्न होण्याचा अनुभव आज ठाणेवैभव आणि अ.भा. मराठी बालरंगभूमी परिषदेने संयुक्तपणे साजऱ्या केलेल्या दिवाळी धमाल उपक्रमानिमित्त आला.
भिवंडी तालुक्यातील कवाड येथील जिल्हा परिषद शाळेत सोमवारी सकाळपासूनच मुलांची किलबिल सुरू होती. शनिवारी परीक्षा संपल्यामुळे आनंदी मुले शाळेत जमा होऊ लागली ती धमाल करण्यासाठी. मुली एकीकडे नृत्याची तालिम करीत होत्या. तर काही जणी रांगोळ्या काढण्यात मग्न होत्या. आवारात गर्द झाडांच्या सावलीत किल्ले बांधण्याचे काम सुरू होते तर ठाणेवैभव आणि बालरंगभूमी परिषदेतर्फे आयोजित उपक्रमाच्या पूर्वतयारीत शिक्षकवर्ग व्यस्त होता.
मुलांसाठी कंदील बनवण्याची कार्यशाळा, रांगोळ्या आणि पणत्या सजवणे, शुभेच्छा कार्ड बनविणे याचे प्रशिक्षण कलाशिक्षक देत होते. एकाहून एक सुंदर कलाकृती तयार होत शाळेच्या व्हरंड्यात मांडल्या जाऊ लागल्या.
गच्चीत झालेल्या कार्यक्रमात बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा निलमताई शिर्के उपस्थित होत्या. त्यांनी आणि ठाणेवैभवचे संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी मुलांशी हितगुज करुन दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.
‘ठाणेवैभव’तर्फे दिवाळीचा फराळ वाटप झाले तर सौ. निलमताईंनी मुलांसाठी आणलेले जेवण देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी शालेय समितीचे प्रशांत डोंगरे, निलेश गुरव, कवाड गावचे रहिवासी डॉ. विवेक आणि सौ. मेखला कर्वे, मुख्याध्यापक विजय भोईर, शिक्षिका नंदा फुलपगारे, संध्या आंब्रे, श्रीमती भालेराव, श्रीमती सोनटक्के, बालरंगभूमी परिषदेचे पदाधिकारी प्रा. मंदार टिल्लू, पी. एन. पाटील, सौ. मेघना साने, सौ. सुचेता आणि सुनिल रेग, स्वाती आपटे, रोटरी क्लब ऑफ मिडटाऊनचे अध्यक्ष गौरव कंदळकर, धवल केनिया, माजी अध्यक्षा वासंती गोकाणी, सौ. टिल्लु आदींनी हा उपक्रम यशस्वी करण्यात मदत केली.
ठाणेवैभव परिवारातर्फे श्रीमती कुमुदिनी बल्लाळ, सौ. मंजुषा बल्लाळ, निखिल बल्लाळ, सौ. जुईली बल्लाळ-कुलकर्णी यांनी जातीने या उपक्रमात सहभाग घेतला. चि. क्रिश निखिल बल्लाळ यांनी गोष्टी सांगून लक्ष वेधून घेतले.