पहिल्या लॉकडाऊननंतर दोन वर्षांनी
गुड बाय करोना!
ठाणे : दोन वर्षांपूर्वी २२ मार्च रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात लॉकडाऊन जाहीर केला होता. त्यानंतर बरोबर २१ मार्च रोजी ठाण्यातून कोरोना हद्दपार झाला आहे. शहरात आज एकाही रुग्णाची नोंद झाली नाही तर तीन जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरात अवघे २५ सक्रिय रूग्ण राहिले आहेत.
महापालिका हद्दीतील सर्वच प्रभाग समिती क्षेत्रातील नवीन कोरोना रुग्णांची पाटी कोरी आहे. विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेणाऱ्या रूग्णांपैकी तीन जण रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ८१,४८९ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी अवघे २५ रूग्ण आहेत. एकही रूग्ण दगावला नसून आत्तापर्यंत २,१२७जणांचा मृत्यू झाला आहे.
महापालिका प्रशासनाने काल शहरातील ५१४ नागरिकांची कोरोना चाचणी घेतली होती. त्यामध्ये एकही रुग्ण बाधित सापडला नाही. आत्तापर्यंत २३ लाख ९५,९७९ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये एक लाख ८३,६४१जण बाधित मिळाले आहेत.
विशेष म्हणजे राज्यातही सोमवारी दिवसभरात ९९ रुग्णांची नोंद झाली असून एकही रुग्ण मृत्यू पावला नाही. लसीकरणाचे प्रमाण वाढल्यामुळेच संसर्ग आटोक्यात आल्याचे बोलले जात आहे.
शहरात आत्तापर्यंत ९९टक्के नागरिकांनी लसीचा पहिला तर ८०टक्के नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. ठाणेकरांनी सहकार्य केल्यामुळेच कोरोनावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.नागरिकांनी मास्क वापरणे, हात धुणे आणि सामाजिक सुरक्षित अंतर राखणे या त्रिसुत्रीचे पालन करावे.
– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त-ठाणे महापालिका
रविवारी ठाणे शहरात शून्य रुग्णांची नोंद झाली, याचे श्रेय आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना जाते. मात्र चीन आणि युरोपात कोरोनाची चौथी लाट सुरू असून भारतात ती कधी येईल हे सांगता येत नाही. त्यामुळे नागरिकांनी वेळीच लसीकरण करून घ्यावे आणि सुरक्षिततेच्या त्रिसूत्रीचे पालन करावे.
– डॉ. कैलास पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रुग्णालय ठाणे