शून्य इंधन दिवस : एनएमएमटीची अडीच कोटींची बचत

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहनतर्फे शनिवार आणि रविवार ‘शून्य इंधन दिवस’ योजना राबविण्यात येत आहे.  या योजनेअंतर्गत इंधनावरील बस पूर्णतः बंद ठेवून केवळ विद्युत बस रस्त्यावर चालविल्या जात आहेत.  या योजनेमुळे गेल्या वर्षभरात एनएमएमटीला तब्बल अडीच कोटींचा फायदा झाला आहे. या दरम्यान २ लाख ४५ हजार ९५६ लिटर डिझेलची बचत झाली आहे.

नवी मुंबई परिवहन उपक्रमाने १५ जानेवारी २०२२ पासून शून्य इंधन दिवस योजनेला सुरुवात केली आहे.  एनएमएमटीच्या ताफ्यात विद्युत बसेसचा वापर वाढवून इंधनावरील खर्च कमी करून तोटा भरून काढण्यासाठी हे नियोजन आखण्यात आले आहे. आठवड्यात शनिवारी आणि रविवारी तसेच सार्वजनिक सुट्टी दिवशी विद्युत बस वापरात आणून इंधनावरील खर्च कमी करण्यात येत आहे. त्यामुळे महिन्याकाठी  परिवहनला २३ लाखांची बचत होत आहे. त्यामुळे वर्षभरात इंधनावरील खर्च कमी झाला असून एका वर्षात अडीच कोटींचा फायदा झाला आहे.