* ६० हजार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
* ६० विद्यार्थी घेणार दत्तक
ठाणे: राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री व शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांचा साठावा वाढदिवस युवा सेना राज्यभर जल्लोषात विविध शैक्षणिक सेवा उपक्रम राबवून साजरा करणार आहे.
राज्यात ६० हजार विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य वाटप केले जाणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून युवा सेना ‘शैक्षणिक मदत कक्ष’ सुरू करणार असून वर्षभर गरजू गरीब विद्यार्थ्यांना हा कक्ष मदत करणार आहे, अशी माहिती युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी दिली.
शिवसेनेचे मुख्य नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ९ फेब्रुवारी रोजी साठावा वाढदिवस आहे. तर युवकांना नेहमी मार्गदर्शन करणारे कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा ४ फेब्रुवारी रोजी वाढदिवस आहे. या दोघांच्या वाढदिवसानिमित्ताने युवासेनेच्या माध्यमातून दोन राज्यव्यापी मोठे उपक्रम राज्यभर व्यापक प्रमाणात राबवण्यात येणार आहेत. शिवसेनेचा जसा वैद्यकीय सहायता मदत कक्ष आहे, तसा युवा सेना आता शैक्षणिक मदत कक्ष सुरू करणार आहे. युवा सेनेच्या माध्यमातून हा शैक्षणिक मदत कक्ष वर्षभर काम करणार असून प्रत्येक जिल्ह्यात सक्रिय राहील. गरीब गरजू अनाथ मुलांना तसेच विविध कारणांनी ज्यांना शिक्षण घेण्यात अडचणी येत आहेत त्यांना मदत करण्यासाठी हा कक्ष काम करेल असे पुर्वेश सरनाईक म्हणाले.
वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील ६० हजार अनाथ व गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्या आणि शैक्षणिक साहित्य वाटप केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात हा कार्यक्रम राबवण्यात येईल व युवासेना मध्यवर्ती कार्यालयाकडून हे वह्या वाटप कार्यक्रम नियोजन केले जाईल. जिल्हा परिषद शाळा, अनाथ आश्रम अशा ठिकाणीही उपक्रम राबवले जाणार आहेत. एका विद्यार्थ्यांला किमान सहा वह्या दिल्या जातील. अशा तीन लाख ६० हजार वह्यावाटप करण्याचे नियोजन आहे.
शैक्षणिक मदत कक्षाच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील ६० अनाथ मुलांना दत्तक घेतले जाणार आहे. या मुलांना दत्तक घेताना त्यांची संपूर्ण वर्षाची शैक्षणिक जबाबदारी युवा सेना घेणार आहे, असे पूर्वेश सरनाईक म्हणाले.