युवा प्लस…युवकांच्या विचारांचे सशक्त व्यासपीठ – मिलिंद बल्लाळ

जोशी-बेडेकर आणि ज्ञानसाधना कॉलेजमध्ये ‘युवा प्लस’चे प्रकाशन

ठाणे : आगामी काळात देशाच्या विकासात तरुणांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. त्यासाठी त्यांनी समाज बांधणीच्या प्रक्रियेत सहभागी होण्याची गरज आहे. तरुणांना निर्णयक्षम करण्यासाठी त्यांना वाचन, मनन आणि चिंतनासाठी सज्ज करण्याच्या हेतूने ‘ठाणेवैभव’ युवा प्लस पुरवणी घेऊन आला आहे, असे प्रतिपादन संपादक मिलिन्द बल्लाळ यांनी केले.

ठाण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यासाठी ‘युवा प्लस’ या महाविद्यालयीन बातमीपत्राचे अनावरण जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात करण्यात आले. २९ नोव्हेंबर रोजी जोशी-बेडेकर महाविद्यालय आणि ३० नोव्हेंबर रोजी सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात या उपक्रमाचे उद्घाटन सोहळे आयोजित करण्यात आले होते.

समाजातील सर्व घटकांना व्यासपीठ देण्याचे काम ‘ठाणेवैभव’ सातत्याने करीत असते, असे सांगून श्री बल्लाळ यांनी तरुणांना मुद्रित आणि डिजिटल माध्यमांचा समसमान वापर करण्याचे आवाहन केले. ते पुढे म्हणाले, युवा प्लसमुळे युवकांच्या विचारांना, भाषेला एक हक्काचं व्यासपीठ मिळेल.

जोशी-बेडेकर महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ठाणेवैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक, उपप्राचार्य आणि समन्वय डॉ. महेश पाटील उपस्थित होते. यात श्री. मिलिंद बल्लाळ यांनी वाचनाचे महत्त्व स्पष्ट करताना म्हटले, “५० ग्रॅम लिहिण्यासाठी पाच किलो वाचावे लागते. वाचन करणे ही काळाची गरज आहे.” तर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक म्हणाल्या, तरुणांनी दररोज वाचन केले पाहिजे. वाचन हे केवळ ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठीच नव्हे, तर व्यक्तिमत्त्व विकासासाठीही महत्त्वाचे आहे. महाविद्यालयाचे उपप्राचार्य आणि समन्वक डॉ. महेश पाटील यांनी ‘युवा प्लस’ सुरु केल्याबद्दल ‘ठाणेवैभव’चे आभार मानले आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखनकौशल्यासाठी या मंचाचा फायदा घेण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘ठाणेवैभव’चे व्यवस्थापकीय संपादक निखिल बल्लाळ यांनी केले. “विद्यार्थ्यांनी ‘युवा प्लस’ साठी लेख, कविता आणि महाविद्यातील जीवनशैलीतील हलके फुलके विषय हे पाठवावे,” असे आवाहन त्यांनी केले. यासोबत विद्यार्थ्यांच्या सहभागाने हे वृत्तपत्र अधिक समृद्ध होईल, असे त्यांनी सांगितले.

सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात अध्यक्ष कमलेश प्रधान, सरचिटणीस डॉ. मानसी प्रधान, प्राचार्य डॉ. गणेश भगुरे आणि ‘ठाणेवैभव’चे संपादक मिलिंद बल्लाळ उपस्थित होते. या कार्यक्रमात प्राचार्य डॉ. गणेश भगुरे यांनी ‘युवा प्लस’च्या माध्यमातून युवकांना लिखाण करण्याची संधी प्राप्त होईल, असे मत व्यक्त केले. तर निखिल बल्लाळ म्हणाले, आम्ही ‘ठाणेवैभव’च्या ५० व्या वर्षात अनेक उपक्रम करत आहोत. त्यातलाच ‘युवा प्लस’ हा उपक्रम आहे आणि त्यासाठी प्रत्येकाने लिहावे. महाविद्यालयाचे अध्यक्ष कमलेश प्रधान म्हणाले, ठाण्यात ठाणेवैभव अनेक नवनवीन उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे.

या दोन्ही कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांनी ‘युवा प्लस’मुळे त्यांचे विचार मांडण्यासाठी मिळालेल्या संधीबद्दल आनंद व्यक्त केला. जोशी-बेडेकर महाविद्यालयात सूत्रसंचालन वेदश्री पवार, तर आभार प्रदर्शन संस्कृती शेलार यांनी केले. सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयात सूत्रसंचालन पूर्वा कदम आणि गौरी खरे, तर आभार प्रदर्शन साक्षी साबळे यांनी केले.