बोट उलटल्याने युवक उल्हास नदीत बेपत्ता

कल्याण: कल्याण जवळच्या मोहने येथील उल्हास नदीमध्ये मासळी पकडण्यासाठी जाळे टाकत असताना मध्यरात्रीच्या सुमारास बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत एक युवक पोहता येत नसल्याने बुडाल्याची घटना घडली आहे.

यापैकी चार जणांना पोहता येत असल्याने ते उल्हास नदीकिनारी आले मात्र आज सायंकाळपर्यंत अग्निशमन दलाने शोध घेऊनही बुडालेला युवक सापडला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले.

मोहने येथील यादव नगर विभागात राहत असणारा स्वप्नील शांताराम रोकडे (३३) वर्षे आपल्या चार मित्रासह मच्छीमारी करण्यासाठी रात्रीच्या सुमारास उल्हास नदीत सोबत घेतलेल्या बोटीने जाळे टाकत होता. साधारण रात्री एकच्या सुमारास उल्हास नदीच्या मधोमध जाळे टाकत असताना अचानक बोट पलटी झाली. बोट पलटी झालेल्या दुर्घटनेत पाच जणांपैकी चौघांना पोहता येत असल्याने ते उल्हास नदीकिनारी आले. मात्र स्वप्निलला पोहता येत नसल्याने या दुर्घटनेत तो बुडाला. रात्रीमध्ये तसेच दुपारी ही बुडाल्याच्या ठिकाणी त्याचा शोध घेतला असता तो अग्निशमन दलाच्या जवानांना मिळून आला नाही. कल्याण अग्निशामक दलाचे जवान त्याचा शोध घेत असून तो अद्यापही मिळून आला नसल्याची माहिती यावेळी पोलीस व अग्निशामक विभागाने यावेळी दिली आहे.